दोन दोन महिने पैसेच मिळत नाहीत
चिपळूण : शासनाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहिना वेळेवर पंधराशे रुपये दिले जात आहेत; मात्र अपंगांना जाहीर केलेले पैसे दोन-दोन महिने मिळत नाहीत. ज्या पैशांवर आमची उपजीविका आहे त्या पंधराशे रुपयांसाठी दिव्यांगांना या योजनेच्या लाभासाठी फेऱ्या माराव्या लागत असल्याची व्यथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, अपंग कल्याण विभागाचे चिपळूण शहर उपाध्यक्ष राजेश रामचंद्र सुर्वे यांनी मांडली आहे.
या संदर्भात राजेश सुर्वे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मी स्वतः एक दिव्यांग व्यक्ती.असून, दिव्यांगांसाठी काम करतो.. शासन आम्हा दिव्यांगांना मासिक पंधराशे रुपये देत आहे; मात्र ते पैसे आम्हाला दोन-दोन महिने मिळत नाहीत. आम्ही काम करण्यास सक्षम नाही. आम्ही दिव्यांग आहोत. त्याच पैशांवर आमची उपजीविका, औषधपाणी चालते. आम्हाला शासनाकडून मिळणाऱ्या पंधराशे रुपयांसाठी फेऱ्या माराव्या लागतात; मात्र लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना अगदी वेळेवर पेसे दिले जातात. ते पैसे जर वेळेवर वाटप केले जात असतील तर दिव्यांगांच्या आर्थिक मदतीबाबतही विलंब करू नये, अशी मागणीही सुर्वे यांनी केली आहे.