रत्नागिरी:-मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ही नक्कीच आनंदाची बाब आहे; पण मराठीचा नुसता अभिमान बाळगून उपयोग नाही. चांगले साहित्य वाचले पाहिजे, चांगल्या मराठीत बोलले पाहिजे. तरच पुढच्या पिढ्यांवरही त्या संस्कारांचे बीजारोपण होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.विलास कुवळेकर यांनी केले.
रत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या नवव्या दिवाळी अंकासाठी ‘कोकणातील ग्रामदैवते’ या विषयावर अशोक प्रभू स्मृती लेख आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. येथील लोकमान्य वाचनालयात हा समारंभ झाला. लोकमान्य वाचनालय या कार्यक्रमाचे सहआयोजक होते.
अॅड. कुवळेकर पुढे म्हणाले, कोणतीही भाषा चांगलीच असते; पण जिला आपण आपली भाषा म्हणतो, त्या भाषेतील आपण काय वाचतो, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. लेकरांनीच आपल्या आईचा गौरव करायला पाहिजे. मराठीत खूप काही वाचण्यासारखे आहे. मराठीचा अभिमान बाळगतो; पण एक वाक्य चांगल्या मराठीत बोलता येत नाही, अशी स्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ती बदलायला हवी. साहित्य संस्कार देते. आजूबाजूच्या वाचक-लेखकांनी एकत्र जमून भाषेविषयी काही उपक्रम राबवले पाहिजेत. कोकणी माणूस मुळात गूढ आहे. खानोलकर, दळवींचे लेखन वाचल्यास आणि बाळकृष्ण प्रभुदेसाईंच्या कथांतून कोकणी माणूस कसा आहे ते कळते, असेही त्यांनी सांगितले.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष आणि ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांचे प्रवर्तक सुभाष लाड कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. कोकण मीडियाने कोकणाच्या वैशिष्ट्यांचे ब्रँडिंग करून कोकणाचे महत्त्व अधोरेखित करणारा दिवाळी अंक म्हणून मानाचे स्थान पटकावल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. वाचनालयातर्फे विजय बेर्डे यांनी आपले विचार मांडले. संपादक प्रमोद कोनकर यांनी प्रास्ताविकात कोकण मीडियाचा उद्देश, तसेच स्पर्धा आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली.
लेख स्पर्धेचे परीक्षण केलेले ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर, तसेच स्पर्धेतील विजेते बाबू घाडीगावकर आणि विराज चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उमेश केसरकर, विनोद बेनकर, विजयालक्ष्मी देवगोजी, जयराज मांडवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
लेख स्पर्धेतील बाबू घाडीगावकर (प्रथम, १००० रुपये), विराज चव्हाण (द्वितीय, ७५० रुपये), तसेच चित्रकला स्पर्धेतील सुयोग रहाटे (द्वितीय, ७५० रुपये), साहिल मोवळे (तृतीय, ५०० रुपये) या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. लेख स्पर्धेतील तृतीय क्रमांकाच्या विजेत्या स्वानंदी जोगळेकर यांच्या वतीने त्यांच्या वडिलांनी पारितोषिक स्वीकारले.