रत्नागिरी : प. पू. स्वामी स्वरुपानंद जयंती उत्सवानिमित्त 22 डिसेंबर रोजी रत्नागिरी ते पावस पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ठीक 4.30 वा. जयस्तंभ येथून पदयात्रेला प्रारंभ होईल. पदयात्रेचे यंदाचे बावीसावे वर्ष आहे.
मुखाने ओम राम कृष्ण हरि नामजप उच्चारत, पहाटेच्या धुंद वातावरणात, गुलाबी थंडीचा अनुभव घेत, ज्ञानदेवांचा हरिपाठ गात ही पदयात्रा मार्गक्रमण करते. चालण्याने आरोग्याची चाचणी घेता येते. आपला धीर- संयम किती आहे हे तपासून बघता येते. ही काही चालण्याची स्पर्धा नव्हे पण आपले आरोग्य किती मजबूत आहे, श्वास किती खोलवर घेता येतो हे आजमावल्यामुळे आपल्या जगण्याला एक नवी उभारी येते. ही स्वामी नामाची मॅरॅथॉन आहे असे समजावे व जास्तीत जास्त भक्तांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन या यात्रेचे संयोजक अनंत आगाशे व राजन पटवर्धन यानी केले आहे.
या यात्रेचा पहिला थांबा कोहिनूर हॉटेल जवळ, दुसरी विश्रांती फणसोप शाळेबाहेर, तिसरा थांबा रनपार फाटयावर आहे. ही यात्रा साधारणपणे पावस येथे सकाळी 9 वाजेपर्यंत पोहोचेल. त्यानंतर मंदिरासमोर फेर धरून नाचणे, अभंग गाणे, नंतर शीण घालवण्यासाठी अल्पोपहार झाल्यानंतर ट्रक किंवा तत्सम वाहनाने रत्नागिरी येथे परत अशी आखणी करण्यात आली आहे.
सफेद साधा पेहराव आवश्यक
यात्रेत सहभागी होणाऱ्या स्त्री -पुरूष भक्तगणांचा पेहराव शक्यतो पांढऱ्या रंगाचा असावा, पुरुषांसाठी पांढरी टोपी बरोबर आवश्यक. आवश्यक असल्यास पाणी बाटली आणावी व शक्यतो सर्वांनी नेहमीच्या वापरातले साधे चालण्यासाठीचे बूट/चप्पल घालावेत. अधिक माहितीसाठी अनंत आगाशे 7083162975 यांच्याकडे संपर्क साधायचा आहे.