न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेणार
चिपळूण : खेड तालुक्यातील मेटे मोहल्ला येथील काहींनी केलेल्या अमानुष मारहाणीची व विनयभंगाची तक्रार खेड पोलिस स्थानकात दिली आहे. तक्रारीत सहा जणांची नावे असताना केवळ तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप खेड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेले नाही. कारवाईत राजकारण होत असल्याचा संशय आहे. याप्रकरणी कारवाई न झाल्यास पोलिस स्थानकातच ठिय्या मांडून मुख्यमंत्र्यांकडे धाव घेणार असल्याचे खेड तालुक्यातील घाणेखुंट येथील जमिला आदिल शहा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
याबाबत माहिती देताना जमिला शहा म्हणाल्या, ५ डिसेंबर रोजी आपला अल्पवयीन मुलगा मित्रासोबत खेळण्यासाठी म्हणून बाहेर पडला असता, तो घरी न परतल्याने त्यांच्या मोबाईवर संपर्क केला. त्यावेळी संबंधित व्यक्तीने अश्लील शिवीगाळ केली. घटनास्थळी न आल्यास मुलास जिवे मारण्याची धमकी दिली. गंभीर प्रकार वाटल्याने पतीसह चिपळूण येथील भावांना तेथे बोलावून घेतले. भावाने पोलिसाशी संपर्क साधल्यानंतर पोलिस त्वरित तेथे दाखल झाले. पोलिसांसमवेतच आम्ही मेटे मोहल्ला येथे पोहोचलो.
मुलांना मारहाण केल्याची विचारणा केल्यानंतर तेथील जमावाने शिवीगाळ करण्यात सुरवात केली. तेथील ४० ते ५० जणांच्या जमावाने आम्हाला अमानुष मारहाण केली. अल्पवयीन मुलासह भावांनाही तेथे शिवीगाळ करीत मारहाण झाली. पोलिसांसमक्ष हा प्रकार सुरू होता.
परिणामी, पोलिस संरक्षणामुळे आमचा जीव वाचला. तेथे जमाव वाढत गेल्यानंतर पोलिसांची एक जादा तुकडी तेथे त्वरित पोहोचली. या प्रकाराबाबत खेड पोलिस स्थानकात तक्रार दिल्यावर तिघांवर गुन्हा दाखल झाला. परंतु, अमानुष मारहाण व विनयभंगप्रकरणी ६ जणांची नावे दिली असताना केवळ तिघांवर कारवाई झाली.
दुसरीकडे परस्पर विरोधी तक्रार झाल्यावर चिपळूण पोलिसांनी त्वरित संबंधितांना ताब्यात घेतले. याबाबत खेड पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. याप्रकरणी खेड पोलिस स्थानकातच ठिय्या मांडणार आहे. अपना सहयोग फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा जरीन रूमाणी म्हणाल्या, खेड पोलिस स्थानकात तक्रार दाखल होऊन सहा दिवस झाले.