दापोलीतील घटना, परजिह्यातील कंडक्टर महिला तत्काळ निलंबित
दापोली : ज्येष्ठ नागरिकाला तुम्ही त्यांच्या जागेवर जाऊन तिकीट द्या, तुमच्याकडे कुठे त्यांना बोलावताय असे सांगितल्याचा रागातून महिला कंडक्टरने प्रवाशांच्या कानशिलात मारून शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी दापोली दाभोळ मार्गावर घडली.
सविस्तर वृत्त असे की, शनिवारी दुपारी 2.30 वाजताची दापोली-दाभोळ बस दाभोळकडे रवाना झाली. दरम्यान या बसमध्ये एक प्रवासी चढले होते. त्या प्रवाशाने शंभर रुपये महिला कंडक्टरकडे तिकिट काढण्यासाठी दिले. महिला कंडक्टरने त्यांना उर्वरित सुट्टे पैसे नंतर घ्या असे सांगितले. यावर तो प्रवासी एका सीटवर जाऊन बसला. यानंतर महिला वाहक चालकाच्या केबिनमध्ये जाऊन शेजारी सीटवर बसली. यानंतर एक वृध्द नागरिक बसमध्ये चढले. यावेळी या महिला कंडक्टरने चालकाच्या केबिनमधूनच त्या वृद्ध नागरिकाला इकडे येऊन तिकिट घ्या, असे फर्मान सोडले. यावर याआधी तिकिट घेऊन बसलेल्या प्रवाशाने त्या महिला कंडक्टरला केबिनमध्ये जाऊन तुमचे हे वागणे बरोबर नाही, तुम्ही वयोवृद्ध नागरिकाजवळ जाऊन त्याचे तिकिट काढायला पाहिजे असे सांगितले.
याचा राग येऊन या महिला कंडक्टरने या प्रवाशाच्या कानफटात मारली. शिवाय शिवीगाळ केली. यानंतर हे प्रकरण दाभोळ पोलीस ठाण्यात गेले. दाभोळ पोलीस स्थानकात सदर प्रवाशाची तक्रार लिहून घेण्यात आली. महिला वाहकाला मात्र समज देण्यात आली. या महीलेविषयी दापोली आगाराकडे चौकशी केली असता ही महिला कंडक्टर विषयी यापूर्वी देखील तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे महिला कंडक्टरला निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.