एकाला अटक, एक फरार
रत्नागिरी : गजबजलेल्या वस्तीतही घरफोडी करण्याची मजल चोरट्यांनी मारली आहे. पोलिसांना धाक राहिला नसल्याने घरफोडी करण्याची हिम्मत चोरटे दाखवू लागले आहेत. शहरालगतच्या कर्ला येथे 4 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 च्या सुमारास घरफोडी करुन चोरट्यांनी 4 लाखांचे सोन्याचे दागिने चोरल्याची खळबळजनक घटना घडली. या चोरी प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून त्याला सोमवारी न्यायालयापुढे हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर यातील मुख्य आरोपी हा फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
अलमुहिब अजगर सोलकर (29, ऱा कर्ला रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्याचे नाव आह़े. 4 डिसेंबर 2024 रोजी कर्ला येथील राहणारे दाम्पत्य घरी नसताना चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. चोरट्यांनी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान मागील बाजूने घरामध्ये प्रवेश केल़ा. यावेळी चोरटयानी बेडरुममधील लाकडी कपाट उचकटून आतील सोन्याचे दागिने चोरुन नेले.
चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये 17 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, 41 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगडया, 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याची गाजरी चैन, 10 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार असा मुद्देमाल चोरुन नेल़ा अशी तक्रार शहर पोलिसांत करण्यात आली आह़े त्यानुसार पोलिसांनी चोरटयाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 331(3), 305(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांना चोरीप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात यश आले. त्याची कसुन चौकशी केली असता त्याने आपले नाव अलमुहिब सोलकर असे सांगितले.
याप्रकरणातील आणखी एक संशयित फरार असल्याचे सांगण्यात येत असून चोरीतील दागिने याच संशयिताकडे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.