रत्नागिरी:-एमआयडीसी येथे सर्व सोयीसुविधांनी युक्त असे क्रीडा संकुल उभारण्याचे काम काही महिन्यांपूर्वी अपुऱ्या निधीच्या कात्रीत अडकले होते. पण आता त्यासाठी आवश्यक निधी प्राप्त झाल्याने हे काम गतीने सुरू झाले आहे.
रत्नागिरीसारख्या जिल्ह्यात कमी साधनसुविधा असतानाही या जिल्ह्याने चांगले खेळाडू दिले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियाई, राष्ट्रकुल व जागतिक अजिंक्य स्पर्धांमध्ये खेळाडूंनी आपल्या खेळाचा ठसा उमटवून जिल्ह्याला खेळामध्ये मानाचे स्थान मिळवून दिले आहे. रत्नागिरीतील खेळाडूंसाठी दर्जेदार क्रीडा संकुल उपलब्ध होण्यासाठी एमआयडीसी येथे 11.50 एकर जागेत क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. या संकुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या या ठिकाणी कार्यालय, चेंजिंग रूम्स, वसतिगृह अशी कामे पूर्णत्वास गेली आहेत.
सुरवातीच्या काळात क्रीडा संकुलाला आवश्यक असणारा निधी कमी पडल्याने हे काम संथगतीने काम सुरू होते. त्यासाठी कामासाठी निधीची उपलब्धता होण्याची प्रतीक्षा लागून राहिली होती. गेल्या काही वर्षांपासून अर्धवट स्थितीत असलेल्या मिरजोळे एमआयडीसीतील जिल्हा क्रीडा संकुल उभारणीच्या कामास गती देण्यासाठी तातडीने तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात आल्या. त्यासाठी माजी मंत्री आणि विद्यमान आमदार उदय सामंत यांनीही विशेष लक्ष देत प्रशासकीय यंत्रणांना वेळोवेळी हे काम मार्गी लागण्यासाठी निर्देश दिले. त्यासाठी आवश्यक असलेला निधीही मंत्रीपदाया काळात वर्ग केला होता.
क्रीडामंत्र्यांकडे झालेल्या बैठकांमुळे 29 कोटीची तरतूद करण्यात आली. त्यामधून सर्व सोयीसुविधांयुक्त जिल्हा क्रीडा संकुल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा संकुलासाठी मंजूर 29 कोटीचा निधीपैकी 7 कोटी रुपये मारुतीमंदिर येथील संकुलावर खर्ची करण्यात आला. उर्वरीत 23 कोटीमधून एमआयडीसी येथे संकुल उभारले जाणार आहे. हे काम येत्या दोन वर्षात पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र अर्धवट स्थितीत रेंगाळलेल्या मिरजोळे एमआयडीसीतील जिल्हा क्रीडा संकुल उभारणीच्या कमामे आता वेग घेतला आहे.