खेड:-मुंबई- गोवा महामार्गावर रायगड जिह्यातील महाड एमआयडीसी हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात वसीम हैदर अन्सारी (रा. महाड, मूळगाव उत्तरप्रदेश) याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील अन्य दोघे जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. समोरील रिक्षाला बाजू काढताना हा अपघात घडला.
हर्षद अंकुश भालेकर असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्याच्यासह अन्य जखमीला महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वसीम अन्सारी हा आपल्या ताब्यातील दुचाकीवरून सहकाऱ्यासमवेत महाड येथील नांगलवाडीच्या दिशेने जात होता. यावेळी एका वाहनाला ओव्हरटेक करताना समोरील दुचाकीवर आदळला. हा अपघात इतका भीषण होता की, वसीम अन्सारी याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताचे वृत्त कळतात महाड पोलीस अंकाचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने व सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून जखमींना मदतकार्य केले. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेने यंत्रणांची तारांबळ उडाली. अपघातग्रस्त दोन्ही दुचाकी बाजूला हटवल्यावर विस्कळीत वाहतूक पूर्ववत झाली.