प्रशासनाकडे निवेदन देऊन केलीय डोळेझाक
रत्नागिरी : नजीकच्या मिऱ्या गावात विकासकामे करताना अत्यंत निकृष्ट पध्दतीची केली जात आहेत. याबाबत ग्रामपंचायतीलाही विचारात घेतले जात नाही. ग्रामस्थांच्या न विचारताच त्याच्या जमिनीतून ही कामे सुरु आहेत. संबंधित यंत्रणा व प्रशासनाने त्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे सोमवारी मिऱ्या सरपंच, उपसरपंचांसह सदस्य व ग्रामस्थांनी विविध समस्यांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
गावातील विकासकामांच्या समस्यांबाबत ग्रामपंचायतीच्यावतीने 15 ऑगस्टपूर्वीच विविध कामांविषयी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. परंतु कोणत्याही कामात सुधारणा झाली नसल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जलजीवन मिशन अंतर्गत जाकीमिऱ्या व भाटीमिऱ्या नळपाणी पुरवठा योजना वितरण वाहिनी पाईपलाईनचे काम सुरु आहे. महावितरण अंतर्गत भूमिगत केबल टाकणे व स्ट्रीटलाईटचे काम सुरु आहे. मिऱ्या-नागपूर हायवेचे काम दर्जाहिन पध्दतीचे झाले आहे. पावसाळ्यात महावितरणच्या भूमिगत केबलमुळे स्ट्रीटलाईटच्या खांबांना शॉक लागून दोन जनावरे दगावल्याची घटना घडली होती, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच भारती शिपयार्डच्या जागी सुरु असलेल्या योमेन कंपनीकडून स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांचे पत्र देण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाकडून महावितरण, जिल्हा परिषदेसह संबंधित विभागांना याची माहिती देण्यात आली होती. परंतु त्याकडे पुरती डोळेझाक या यंत्रणेकडून करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
जिल्हा प्रशासनाला त्यामुळे नोव्हेंबरमध्ये पुन्हा आठवण म्हणून निवेदन देण्यात आले होते. परंतु त्यानंतरही या कामांमध्ये सुधारणा झाली नाही. अखेर ग्रामपंचायतीच्यावतीने बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. सोमवारपासून मिऱ्या ग्रा.पं.सरपंच आकांक्षा कीर, उपसरपंच उषा कांबळे, सदस्य आदिती भाटकर, स्मिता शिरधनकर, मानसी शिरधनकर, आर्या सावंत, रामदास बनप, आदेश भाटकर, गुरुप्रसाद माने, विजेंद्र कीर यांच्यासह ग्रामस्थ व माजी सरपंच बावा नार्वेकर, संदीप शिरधनकर, भैय्या भाटकर यांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला.