मुंबई:-ऐन थंडीत गेल्या काही दिवसात अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने पावसाला पोषक वातावरण तयार झाले होते. आधीच दमट वातावरण असणाऱ्या मुंबईनगरीत तापमान अधिकच वाढल्यानं नागरिक उकाड्यानं हैराण होत घामानं डबडबले होते.पण आता मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा थंडी सुरु झाली आहे.
गेल्या ९ वर्षांतल्या सर्वात कमी तापमानाची मुंबईत नोंद झाली आहे. मुंबईत किमान तापमान २० अंशांपर्यंत घसरले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढील आठवड्याच्या सुरुवातीला तापमान १८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे
उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मुंबईसह नाशिक, पुण्यात येत्या २४ तासांत थंडीचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे तापमानात वाढ झाली होती. नाशिक शहरात पारा ९.४ अंशावर तर निफाड मध्ये ६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. अवकाळी पावसामुळे गेल्या आठवड्यात थंडी गायब झाली होती. आता पुन्हा तापमानात घट झाल्याने थंडीत वाढ झाली आहे. येत्या ५ दिवसात पुणेकरांना प्रचंड गारठ्यात रहावं लागणार आहे. भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी एक्स माध्यमावर याविषयी पोस्ट केली आहे. पुण्यात तापमानात येत्या पाच दिवसात कसे हवामान असणार याचा अंदाज वर्तवलाय. आज पुण्यात १३ ते १४ अंश तापमानाची नोंद केली जाण्याचा अंदाज आहे. तर येत्या काही दिवसात तापमान ११ अंशांवर जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्ये वादळी थंड वारे वाहत आहेत. पंजाब, हरियाणामध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे. तर राजस्थानमध्ये थंडीची लाट असल्याने महाराष्ट्रात कोरडे व थंड वारे वाहत आहेत.उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईत थंडीचा जोर वाढल्याचं सांगण्यात येत असून येत्या २४ तासांत मुंबईकरांना हुडहुडी भरणार आहे. तर शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा कडाक्याची थंडीची लाट पसरली आहे. यामुळे तापमानाचा पारा ११ अंशावर गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात हुडहुडी पाहायला मिळत आहे. मुंबईतील सांताक्रुज केंद्रावर तापमान १३.७ अंश सेल्सिअसवर होते. तर कुलाब्यातही १९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता खालवली आहे. त्यातच प्रदूषणात वाढ होत आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे मुंबईकरांची तब्येत बिघडली आहे. यामुळे सर्दी, खोकला आणि इतर आजारांचे प्रमाण वाढले आहे. पालिकेने नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.