रत्नागिरी:-महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून प्राथमिक फेरीत कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघाने सादर केलेल्या कढीपत्ता या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे.
याबाबतची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेत खल्वायन (रत्नागिरी) या संस्थेच्या स्वप्नपक्षी नाटकाला द्वितीय, तर श्रीरंग (रत्नागिरी) या संस्थेच्या मॉर्फोसिस या नाटकाला तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. गेल्या २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत रत्नागिरीच्या स्वा. सावरकर नाट्यगृहात अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण ८ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शिवानंद चलवादी, कैलास टापरे आणि श्रीमती मीना वाघ यांनी काम पाहिले.
स्पर्धेतील अन्य निकाल असे – दिग्दर्शन – प्रथम प्रसाद धोपट (नाटक-कढीपत्ता), द्वितीय मनोहर जोशी (नाटक-स्वप्नपक्षी), प्रकाशयोजना प्रथम – मंगेश लकडे (नाटक-स्वप्नपक्षी), द्वितीय – आदित्य दरवेस (नाटक-कढीपत्ता), नेपथ्य प्रथम – प्रदीप तेंडुलकर (स्वप्नपक्षी) द्वितीय प्रदीप पाटील (कढीपत्ता), रंगभूषा प्रथम – नरेश पांचाळ (कढीपत्ता), द्वितीय उदय तांगडी (माझ्या आजीचा बॉयफ्रेंड). उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक गोपाळकृष्ण जोशी (नाटक-मॉर्फोसिस) व अमिषा देसाई (कडीपत्ता), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे – समीक्षा सावंत-देसाई (अखेरचा सवाल), प्रज्ञा वारणकर (माझ्या आजीचा बॉयफ्रेंड), गार्गी सावंत (कढीपत्ता), विजय मिरगे (माझ्या आजीचा बॉयफ्रेंड), किशोर साठे (मॉर्फोसिस), संजय शेलार (अखेरचा सवाल).
सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी पारितोषिक मिळविणाऱ्या संघांचे तसेच इतर पारितोषिकप्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.