चिपळूण::आतापर्यंत सुमारे एक हजार भटक्या श्वानांची नसबंदी करणाऱ्या चिपळूण पालिकेने आणखी पाचशे श्वानांचे निर्बिजीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरात वाढणारी भटक्या श्वानांची संख्या, त्यांच्याकडून लहान बालकांवर होणारे हल्ले आणि नागरिकांमधून होणारी ओरड यावर उपाय म्हणून पालिका प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. या पाचशे श्वानांच्या निर्बिजीकरणासह रेबिज लस दिली जणार असून दहा लाख रुपयांचा खर्च येणार आहे; मात्र या कामासाठी सध्या संस्था मिळत नसल्याने पालिका प्रशासनाला फेरनिविदा काढावी लागली आहे.
चिपळुणात भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या श्वानांच्या झुंडी सध्या शहरात मोकाटपणे फिरत असून महिला, लहान मुले व विद्यार्थी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालिकेने दोनवेळा शहरात भटक्या श्वानांची नसबंदी करून रेबिज लस दिली होती. आतापर्यंत एक हजार श्वानांच्या निर्बीजीकरणासाठी वीस लाखांचा निधी पालिका प्रशासनाने खर्च केला आहे; मात्र तरीही या भटक्या श्वानांची संख्या वाढत असल्याने पालिकेसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
पालिकेने गेल्या महिन्यात या भटक्या श्वानांच्या नसबंदीचा निर्णय घेतला होता. त्या कामासाठी निविदा प्रसिद्ध केली होती; मात्र त्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. पाचशे श्वानांच्या नसबंदी व लसीकरणासाठी दहा लाख रुपयांचा खर्च परवडत नसल्याचे कारण पुढे येत आहे; मात्र काही दिवसांपूर्वी शहरातील एका बालकावर तीन ते चार भटक्या श्वानांनी हल्ला केल्याची घटना घडल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला.