देवरुख: देवरुख शहरामध्ये एकल प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या बाजारपेठेतील व्यापारी व आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांवर रविवार दि.०८ डिसेंबर रोजी प्लॅस्टिक बंदीची धडक कारवाई नगरपंचायत प्रशासनाकडून करण्यात आली. शहरातील व्यापारी, नागरीक, किरकोळ विक्रेते यांना वारंवार सुचना देवूनही एकल प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सर्रास सुरु होता.
त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर निर्बंध घालण्यासाठी व्यापक प्लॅस्टिक बंदी मोहिम राबविण्याचे योजले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून रविवारी आठवडा बाजाराच्या दिवशी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणारे नागरीक व व्यापाऱ्यांकडून प्लॅस्टिक पिशव्यांची जप्ती करुन दंड वसुल करण्यात आला. तसेच प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करुन पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासाबाबत नगरपंचायत मार्फत नागरीकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये जनाजागृती करण्यात आली. नागरीकांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सोडून कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहनही नगरपंचायत प्रशासनाने यावेळी केले. सदर प्लॅस्टिक बंदी मोहिम नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी अभिजीत राणे, प्रविण खरात, स्वच्छता निरिक्षक आरिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाचे लिपीक व कर्मचारी यांनी राबविली.