ब्रेक फेल झाल्याने भयंकर दुर्घटना;
मुंबई:- काळजाचा थरकाप उडवणारी भयंकर दुर्घटना ऐन गर्दीच्या वेळी आज रात्री 9.30 च्या सुमारास मुंबईतील कुर्ला भागात घडली. बेस्टच्या भरधाव एसी बसने अनेक वाहनांना धडक देत किमान 25 जणांना चिरडले.
त्यामुळे एकच हाहाकार उडाला. या भयंकर दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले आहेत. बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटून ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
बेस्टची कुर्ला ते अंधेरी या मार्गावर धावणारी बस क्रमांक 332 अनेकांसाठी काळ ठरली. कुर्ला पश्चिम येथून अंधेरीकडे ही बस निघाली होती. एस. जी. बर्वे मार्गावर अंजुमन-ए-इस्लाम शाळेसमोर बस भरधाव असतानाच चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि भयंकर दुर्घटना घडली. शाळेसमोर प्रथम या बसने रिक्षाला चिरडले. त्यानंतर समोर येणारी वाहने, पादचाऱ्यांना बस उडवत पुढे गेली आणि बाजारपेठेत हाहाकार माजला. किंकाळ्यांनी सारा परिसर हादरून गेला.
रिक्षा, कार, दुचारीसह किमान 30 ते 40 वाहनांना बसने उडवले. 100 मीटरच्या परिसरात पुढच्या सर्वच वाहनांना बसची धडक बसली. त्यानंतर सोलोमोन इमारतीची सुरक्षा भिंत तोडून बस इमारतीला धडकली. इमारतीच्या कॉलमला बसची धडक बसली.
पोलिसांच्या एका व्हॅनलाही बसने धडक दिली. त्यात एक पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात आले. जखमींना कुर्ला येथील भाभा रुग्णालय आणि शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन जखमींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
बसचालक ताब्यात
अपघातानंतर कुर्ला पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाल्याचे प्राथमिक दृष्टया दिसत असल्याचे कुर्ला पोलीसांच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. चालकांने मद्यपान केले होते का ते मात्र उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी कुर्ला पोलीस अधिक तपास करीत आहेत.
शिवसेना मदतीला धावली
अपघाताची माहिती मिळताच तातडीने विभागातील शिवसैनिक मदतीला धावले. सर्वात आधी शिवसैनिकांनी मदतकार्य सुरू केले. जखमींना भाभा आणि शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले असून भाभातील 5 गंभीर जखमींना शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी उपचारासाठी खासगी हबीब रुग्णालयात हलवले आहे. रात्री उशिरापर्यंत शेकडो शिवसैनिक यंत्रणांच्या खांद्याला खांदा लावून मदतकार्य करत होते.