कालच अण्णा जाधव यांनी पोलीस कार्यालयावर धडक देणार म्हटले आणि आरोपी ताब्यात
गुहागर : रविवार 8 रोजी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेऊन आरोपींना गजाआड केले नाही तर चिपळूण पोलीस स्थानकावर मोर्चा काढणार असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर पोलिसांनी 12 तासातच अण्णा जाधवांवरील हल्ल्यातील मुख्य सुत्रधारासह दोघांना ताब्यात घेतले.
विधानसभेच्या ऐन निवडणूकीच्या धामधुमीत वंचित आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर तीन अज्ञात तरूणांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर पोलिसांनी रविवारीच बदलापूर व अंबरनाथ येथून दोघांना अटक केली आहे. या हल्ल्यामध्ये आणखी पाच आरोपी सक्रीय असल्याचे पुढे येत असून गुहागर पोलिसांकडून तपास सुरू आहे. अनुप नारायण जाधव, ( नारायण पॅलेस, राऊत चाळ जवळ, बॅरेज रोड बदलापूर पश्चिम) , कुणाल किसन जुगे (रहाणार घर नं. ४४४५, अण्णा पाटील नगर, शिवानंद मठ शेजारी, अंबरनाथ पश्चिम) असे अटक करण्यात आलेल्या दोन संशयित आरोपींची नावे आहेत.
१७ नोव्हेंबर रोजी दुपारी दिडच्या समारास गुहागर तालुक्यातील नरवण बाजारपेठ येथे वंचितचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा यशवंत जाधव हे आपल्या पत्नीसमवेत हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर आपल्या गाडीजवळ आले होते. अशावेळी तीन अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येऊन चाकूने सपासप वार सुरू केले. मानेवर केलेला वार हात आडवा केला म्हणून हाताला मोठी जखम झाली होती. त्यानंतर हल्लेखोरांनी अण्णा जाधव यांच्या गाडीवरही दगडफेक करून तेथून पलायन केले.
निवडणूकीच्या धामधुमीत झालेल्या या हल्ल्यामध्ये थेट उमेदवारांची नावे घेतली जात होती. मात्र हे प्रकरण तेथेच थांबले. या हल्ल्याप्रकरणी गुहागर पोलिस व चिपळूण क्राईम ब्रांच यांच्याकडून तपास सुरू ठेवण्यात आला होता. सीसीटीव्ही, सीडीआर, डम डेटा तसेच साक्षिदार यांच्या सहाय्याने आरोपींचा मागोवा काढताना अखेर यामधील दोघांना क्राईम ब्रँच यांनी शनिवारी रात्री अंबरनाथ व बदलापूर येथून आणून रविवारी पहाटे गुहागर पोलिसांकडे सुपूर्द केले. गुहागर पोलिसांनी केलेल्या अधिक तपासामध्ये या गुन्ह्यामध्ये आणखी पाच जणांचा सामावेश असल्याचे पुढे येत असून त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. तर रविवारी रात्री उशीरा या दोन आरोंपीवर भा. न्या. सं. कलम ११८(१), ३५२, ३२४ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल अटक करण्यात आली आहे. सोमवारी या दोघांनाही गुहागर न्यायालयामध्ये हजर केले असताना त्यांना १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याच्या तपास गुहागर पोलिस ठाणे करत असून सदर गुन्ह्याचे तपासात पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी चिपळूण राजेंद्र राजमाने, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलिस निरिक्षक नितीन ढेरे, व कर्मचारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सदर गुन्ह्याचा अधिक तपास गुहागर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरिक्षक संदिप भोपाळे करत आहेत.