लांजा : शहरानजीकच्या जिल्हा परिषद शाळा लांजा डाफळेवाडीच्या मुलांनी शाळेत तयार केलेल्या परसबागेने तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. यामधून तयार होणाऱ्या पालेभाज्या विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात वापरल्या असल्याने विद्यार्थ्यांना अत्यंत सकस, पौष्टिक व चवीष्ट आहार मिळत आहे.
शासनाच्या मार्गदर्शनानुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमधील परसबाग निर्मितीचा उपक्रम जिल्हा परिषद शाळा लांजा डाफळेवाडी येथे जून २०२४ पासून अत्यंत उत्साहात राबविण्यात येत आहे. शाळेच्या या अत्यंत नावीन्यपूर्ण व ज्ञानवर्धक प्रात्यक्षिक उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात व आनंदात सहभाग घेतला आणि सृजनशीलतेचा आनंददायी अनुभव विद्यार्थी प्रत्यक्ष घेतलसदर उपक्रमासाठी शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थी, शिक्षक व पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी जोरदार तयारी केली होती. या परसबागेतून विद्यार्थ्यांना निसर्गाचा प्रत्यक्ष सहवास लाभत असून शेतीची माहिती आणि आवड निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.
तसेच शाळेमध्ये परसबाग निर्मिती करताना आधुनिक शेती व यांत्रिक शेती, बैलांचे जोत व ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करून मशागत करुन अळी तयार करत पाले भाजी, पडवळ, काकडी, टोमॅटो, मिरची, वांयगे, घेवडा, दोडका, कारली, झेंडूची झाडे बियाणे लावण्यात व पेरण्यात आली. शिक्षणासोबत मुलांना शेतीची आवड व शेतीविषयक माहिती मिळावी यासाठी हा उपक्रम शाळेमध्ये राबविण्यात आला आहे.
या उपक्रमाचे तालुका स्तरावर परीक्षण करण्यात आले. यासाठी गटशिक्षणाधिकारी आनंद सावंग, विस्तार अधिकारी सौ.हिरवे, केंद्र प्रमुख चंद्रकांत पावसकर, श्री.आयरे यांनी परसबागेचे शासन निकषानुसार मूल्यमापन केले. त्यामध्ये डाफळेवाडी शाळेचा तालुक्यात दुसरा क्रमांक आला आहे.
शाळेत परसबाग राबविण्यासाठी गटशिक्षणाधिकारी श्री.आनंद सावंग, केंद्र प्रमुख श्री.पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.अनुजा पांचाळ, स्थानिक नगरसेविका सौ.दुर्वा भाईशेट्ये, उपाध्यक्ष राजेंद्र तुळसणकर, शाळा सुधार समिती सदस्य प्रसाद भाईशेट्ये, बाबू पांचाळ, कैलास उपशेटे, वसंत कुंभार, तुकाराम कुंभार, सौ.जान्हवी गांधी, मोहसीन खतीब, नरेश कुंभार, फिरोज नेवरेकर, मेघना दुबळे, संजीवनी पांचाळ, लाइका मुगारी, पूजा शिगम, मनस्वी समगिस्कर, प्रभाकर कुंभार, सुभाष कुंभार, महेश पांचाळ, मंगेश पांचाळ, राजेश्वरी पोटफोडे, संजय तेरवणकर, राजेश कांबळे, सौ.नेवरेकर तसेच मुख्याध्यापक मनोज रेडिज, शिक्षिका दिपाली यादव, दीपा मुळ्ये, रूक्मिणी कदम-पाटील या सर्वांनी सहभाग घेतला.
दरम्यान, या परस बागेसाठी दिलीप तोडकरी, संजय तोडकरी, विलास तोडकरी यांनी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिल्यामुळे शाळेला परसबाग उपक्रम राबविता आला. याबद्दल तोडकरी बंधुचे विशेष आभार मानण्यात आले.