संगमेश्वर:- गायन , वादन आणि नृत्य अशा तीनही कलांचा परिपूर्ण संगम असलेला कला संगीत महोत्सव म्हणजेच कर्णेश्वर महोत्सव या महोत्सवामध्ये विशेषतः यावर्षी कथ्थक नृत्य, वाद्यांची जुगलबंदी अशा विविधरंगी कार्यक्रमांची रेलचेल होती. याच ललित कलांना अजून एक कलेची जोड म्हणून सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट सावर्डे या चित्र शिल्प कलामहाविद्यालयातील ७० कला विद्यार्थ्यांनी या भागात असणारे प्रसिद्ध कर्णेश्वर मंदिर तसेच बाजूचा परिसर आपला कुंचला आणि मातीच्या सहाय्याने चित्र आणि शिल्पबद्ध केला .
सह्याद्री कला महाविद्यालयाचे चेअरमन चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, प्राचार्य माणिक यादव यांच्या संकल्पनेतून कर्णेश्वर महोत्सवामध्ये कला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून चित्र आणि शिल्प या कलांचा एक महोत्सवच संपन्न झाला. युवा कलाकारांनी कर्णेश्वर मंदिरातील असंख्य शिल्पांसह आजूबाजूची छोटी छोटी मंदिरे आणि परिसराचे रंग आणि मातीच्या सहाय्याने हुबेहूब रेखाटन करत आनंदाची अनुभूती मिळवली. रेखाटन, रंगकाम आणि माती काम करत असताना विद्यार्थ्यांनी अचूक निरीक्षण , रचनाशास्त्र , पूर्वीच्या कलाकारांची कलेप्रती असणारी निष्ठा अशा विविध गोष्टींचा अभ्यास देखील केला. यावेळी उपस्थित प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कर्णेश्वर कला महोत्सवात रेखाटन,रंगकाम आणि माती काम करत असताना अभ्यास तर झालाच शिवाय आनंदाची अनुभूती घेता आली असं मत युवा कलाकारांनी व्यक्त केले.
सह्याद्री कला महाविद्यालयातील युवा कलाकारांनी रेखाटलेली कर्णेश्वर मंदिर परिसरातील रेखाटने , जलरंग आणि अन्य रंग माध्यमातील चित्रे, माती कामातील शिल्पे , ही येथे येणाऱ्या कला रसिकांसाठी जणू एक प्रकारची पर्वणीच होती . या दरम्यान काढलेली सर्व चित्रे आणि शिल्पांचे कर्णेश्वर महोत्सवा दरम्यान प्रदर्शन भरविण्यात आले होते. कलारसिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेत काही कलाकृतींची खरेदी देखील केली. या चित्र शिल्प प्रदर्शनाचा लाभ महोत्सवासाठी येणाऱ्या सर्वच कला रसिकांनी घेतला.
विद्यार्थ्यांची कला अचंबित करणारी
कर्णेश्वर महोत्सवाला जोडूनच सह्याद्री कला महाविद्यालय सावर्डे यांनी जवळपास ७० विद्यार्थ्यांना या कला महोत्सवात सहभागी करून आम्हा कला रसिकांसाठी त्यांची कला पाहण्याची एक आगळीवेगळी संधी दिली. युवा कलाकाराने कर्णेश्वर मंदिरासह आजूबाजूच्या परिसरातील केलेली विविध रेखाटने, जलरंग माध्यमातील चित्रे , माती कामातील शिल्पे हे सारे पाहिल्यानंतर सह्याद्री मधील विद्यार्थ्यांची कला ही अचंबित करणारी आहे असेच नमूद करावेसे वाटते. या उपक्रमामुळे कर्णेश्वर महोत्सवाला अधिक रंगत आली.
सुबोध जोशी, कला रसिक देवरुख