मजूर महिलेचा गळा दाबून खून, पितळ उघड होऊ नये म्हणून त्यानेही घेतले विष
लांजा : तालुक्यातील इंदवटी येथे रस्त्याच्या कामासाठी राहणार्या मूळच्या पश्चिम बंगालमधील एका मजुराने सोबतच्या महिलेचा गळा आवळून तिला ठार मारल्याची खळबळजनक घटना शनिवारी लांजा तालुक्यातील इंडवटी येथे उघडकीस आली. मात्र तिने विष पिऊन आत्महत्या केल्याचे भासवण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्यानंतर आपण खून केल्याचं उघड होऊ नये यासाठी त्याने स्वतःही विष प्राशन केले.
दरम्यान, स्वतःचा गुन्हा उघडकीस येऊ नये, यासाठी गळा आवळणार्या मजुराने कीटकनाशक प्राशन केले. या घटनेत मृत्यू झालेली सौ. राखी पलाश मंडल (वय 33) तसेच जखमी असलेला निताय संजय मंडल (31 दोघेही राहणार बेलेमथपार, बानापूर कृष्णगंज पश्चिम बंगाल) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, निताय संजय मंडल याच्यावर जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.
या घटनेबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही कामगार म्हणून तालुक्यातील इंदवटी येथे बळीराम कबीराज (43, रा. लांजा) यांच्याकडे रस्त्याच्या सुरक्षा भिंतीच्या कामासाठी कामगार म्हणून आले होते. इंदवटी येथेच ते झोपडी बांधून राहत होते. शनिवारी, 7 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास राखी व निताय या दोघांमध्ये अज्ञात कारणावरून वाद झाला आणि त्यातून त्याने राखीचा गळा आवळल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर निताय याने विषारी औषध घेतल्याने त्याच्यावरही उपचार सुरू आहेत.
या घटनेची खबर ठेकेदार बळीराम कबीराज यांनी लांजा पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी सहकार्यांसह घटनास्थळी भेट दिली. या घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास श्री. बगळे करत आहेत.