रत्नागिरी : रत्नागिरी येथील गावखडी गावचा सुपुत्र आशिष हळदवणेकर याची भारतीय सैन्यदलामध्ये निवड झाली आहे.
बेळगाव येथे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून आशिष ‘मराठा लाईट इन्फ्रंट्री रेजिमेंट’मध्ये नुकताच रूजू झाला आहे. त्या द्वारे निश्चित केलेल्या ध्येयाला खडतर मेहनतीची जोड देत सैन्यदलाच्या माध्यमातून भारतभूमीची सेवा करण्याचे त्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. लष्करामध्ये भरती झाल्याबद्दल ढोलताशाच्या गजरामध्ये आनंदोत्सव साजरा करत गावखडी ग्रामस्थांनी त्याचे स्वागत केले.
रत्नागिरी गावखडी येथील आशिष हळदवणेकर याचे शालेय शिक्षण गावातील शाळेत झाले तर, उच्च माध्यमिक शिक्षण पावस येथील स्वामी स्वरूपानंद माध्यमिक विद्यालयात झाले. कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज अॅकॅडमीमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने भारतभूमीची सेवा करण्याच्या उद्देशाने सैन्यामध्ये भरती होण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी त्याने सैन्यभरतीमध्ये यशस्वी होण्यासाठी खडतर मेहनत घेतली. त्याची मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये निवड होत भारतीय सैन्यामध्ये रूजू होण्याचे स्वप्न साकार झाले.