चिपळूण:- संपूर्ण कोकण जंगलांनी, दऱ्याखोऱ्यांनी, जैवविविधतेने, सह्याद्रीच्या अप्रतिम सौंदर्याने समृद्ध आहे. त्यामुळे कोकणाकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने सुपरिचित व सुप्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळांकडेच पर्यटक आकर्षिले जातात. मात्र या सुपरीचित पर्यटन स्थान सोबतच कोकणामध्ये अशी अनेक अपरिचित सौंदर्यस्थळे आहेत जी जगासमोर आणून समृद्ध कोकणाची ओळख संपूर्ण जगाला करून देण्याची गरज आहे, ज्याद्वारे संपूर्ण जग अपरिचित कोकणची सफर करेल असे मत धीरज वाटेकर यांनी व्यक्त केले.
डी.बी जे.कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिर मौजे चिंचघरी (गणेशवाडी) येथे दिनांक २८ नोव्हेंबर ते ०४ डिसेंबर या कालावधीत संपन्न झाले. यावेळी ‘अपरिचित कोकणची सफर’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाटेकर पुढे म्हणाले की कोकणामध्ये असलेल्या सह्याद्रीच्या रांगा आपले विशाल व विराट दर्शन घडवत आपल्या जगण्याचे ध्येयही असेच विशाल व विराट असायला हवे असे सुचवितात, त्यामुळे अशा विशालकाय पर्वतरांगांमध्ये पर्यटन वाढविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. कोकणातील समुद्रकिनारे आपल्या जीवनात जणू संगीताची सुरेल मैफल सादर करतात. अशा अनेक निसर्गरम्य व आपल्या जीवनात आनंदाची बरसात करणाऱ्या अपरिचित समुद्रकिनाऱ्यांची ओळख जगाला करून देण्याची गरज आहे. कोकणातील देवराया मानवी हस्तक्षेपापासून सुरक्षित असून निसर्ग भ्रमंती करणाऱ्या अनेकांना त्या आज खुणावत आहेत,अशा सुंदर देवरायांचे दर्शन आपण जगाला करवून दिले पाहिजे असे मत व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कोकणातील अनेक अपरिचित निसर्गरम्य पर्यटन स्थळांची माहिती जगाला करून देण्याचे आवाहन केले. यावेळी धीरज वाटेकर यांनी दृकश्राव्य पद्धतीने विद्यार्थ्यांना कोकणातील अनेक अपरिचित निसर्गरम्य स्थळांची सफर घडवून आणली. विद्यार्थ्यांनी या सफरीचा मनमुराद आनंद लुटत अतिशय उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी कोकणातील पर्यटनाचा व्यवसायिक दृष्टीने अभ्यास करण्याचे व यातून करिअरच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन केले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अरुण जाधव, सहकार्यक्रमाधिकारी प्रा. विठ्ठल कोकणी, सल्लागार प्रा. स्वप्निल साडविलकर, एनएसएस विभागाचे सदस्य प्रा. रूपाली दांडेकर, प्रा. रूपाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अनुष्का फके यांनी, प्रमुख वक्त्यांचा परिचय कु. वेदांत साबळे यांनी तर आभार प्रदर्शन कु. हिमानी खेडेकर यांनी केले.