मंडणगड : केंद्र शासनाने संसद ग्राम योजनेमधून हाती घेतलेल्या आंबडवे – राजेवाडी राष्ट्रीय महामार्गाचे काम आठ वर्षांनंतर तरी पूर्ण होणार का, असा प्रश्न तालुकावासीयांना पडला प्रश्न आहे.
२०१६ साली सुरू झालेल्या आंबडवे – लोणंद या राष्ट्रीय महामार्गावरील महाड येथील राजेवाडी ते आंबडवे या सुमारे साठ किमी अंतरात मार्गाचे नूतनीकरण रुंदीकरणाबरोबर काँक्रिटीकरण होत आहे. खूप विलंब होत असलेल्या या मार्गाचे काम सध्या चर्चेत आहे. या प्रकल्पाच्या नूतनीकरणामुळे आजूबाजूच्या परिसरात सुबत्ता निर्माण होईल यात शंका नाही. पर्यटनाबरोबर, दळणवळणासाठी हा मार्ग महत्त्वपूर्ण ठरेल. मात्र भविष्यकालीन वाढती रहदारी आणि लोकवस्ती, वाढते शहरीकरण लक्षात घेऊन महामार्ग प्राधिकरणाने मार्गाचे काम गुणवत्तापूर्ण असणे गरजेचे आहे व त्यासाठी तालुकावासीय आग्रही आहेत.
गेल्या सहा वर्षात हा प्रकल्प केंद्र शासनाच्या अखत्यारित असतानाही रखडलेला आहे. देशभरात रस्त्याची कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असताना मंडणगडच्या पदरी मात्र नेहमीप्रमाणे निराशा पडली आहे. काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची कालमर्यादा असताना आठ वर्षे झाली तरी रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या महामार्गामुळे निर्माण केलेल्या समस्यांना ग्रामस्थ आठ वर्षे सामोरे जात आहेत.
मार्ग तयार होत असताना अनेक ठिकाणी सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली नाही. रस्त्यामधील अनेक धोकादायक वळणे, चढ-उतार अनेक ठिकाणी तशीच ठेवण्यात आली आहेत. हा महामार्ग बनवताना भविष्याचा विचार करण्यात आला नसल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. रस्त्याच्या बाजूने उभी करण्यात आलेली गटारे भविष्यकाळात कळीचा मुद्दा ठरतील की काय, अशीही शंका निर्माण होते. यातील सांडपाण्याचा निचरा कोठे होणार आहे, याचे उत्तर मिळालेले नाही. काम सुरू असलेल्या लगतच्या अनेक गावातील परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
गाड्या उडतात हवेत
तुळशी येथे पावसात खचलेला काँक्रीट रस्ता अद्याप दुरुस्त न केल्याने गाड्या हवेत उडून जोरात आदळण्याचे प्रकार घडत आहेत. यात प्रवाशांना गंभीर मार बसत आहे. मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुर्लक्ष केले आहे.