रत्नागिरी : आसमंत बेनवोलन्सतर्फे दि. ९ ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत सागर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध मान्यवरांकडून मार्गदर्शन, समुद्रकिनारे अभ्यासफेरी, लघुपट अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मत्स्य महाविद्यालय, शिरगाव येथे सर्व कार्यक्रम होणार असल्याची माहिती आसमंत बेनवोलन्स फाऊंडेशनचे नंदकुमार पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
मानवी उत्क्रांतीमध्ये सागरांचे महत्त्व अपार आहे. आधुनिक अर्थव्यवस्था आणि मानवी स्वास्थ्य यात ही सागरांचे मोठे योगदान आहे. परंतु, या गोष्टीची जाणीव सर्वांना असतेच असे नाही. सागरी परिसंस्था आणि रत्नागिरीत जानेवारीमध्ये भरणार सागर महोत्सव त्याचे महत्व सामान्य नागरिकांपर्यंत नेणे आणि त्यातून संवर्धन कार्याची प्रेरणा देणे, याच ध्येयातून गेली तीन वर्षे आसमंत बेनवोलन्सतर्फे सागर महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.
सागर महोत्सवामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय, मत्स्य महाविद्यालाय, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (गोवा), गोखले इन्स्टिट्यूट, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (पुणे), इकॉलॉजिकल सोसायटी (पुणे), कोस्टल कॉन्झर्वेशन फाऊंडेशन (मुंबई) यांचा तांत्रिक सहभाग आहे दरवर्षीच्या कार्यक्रमापेक्षा या वर्षीच्या कार्यक्रमात वैविध्य असणार आहे. या वर्षी महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांनी सागर महोत्सवामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘आसमंत’चे सागर आणि परिसंस्थेचे संशोधनात्मक कामही लवकरच सुरू होणार आहे. या आधी आसमंत आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयानी कोस्टल मॅपिंगचे काम पूर्ण केले आहे. या वर्षी नौदलाच्या युद्ध नौकांचे प्रदर्शन ही भरण्यात येणर असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले.