लांजा : वार्ताहर:-लांजा तालुक्यात दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. यावर्षी पाणी टंचाई तीव्र होऊ नये यासाठी पंचायत समिती प्रशासन सतर्क झाले आहे. पाणी टंचाई निवारण करण्याच्या दृष्टीने २०२४-२५ या वर्षाकरता संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला नसला तरी तत्पूर्वीच लांजा पंचायत विभाग सतर्क झाला आहे. लांजा तालुक्यात ६०० वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प केला आहे.
पाणी टंचाई निवारणसाठी आमदार आणि प्रशासकीय अधिकरी यांच्यामध्ये लवकरच प्रशासनाची एक बैठक होणार असल्याचे समजते. या बैठकीत लांजा तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना मागणीनुसार व पाणी पुरवठा नियोजन केले जाणार आहे. लांजा तालुक्यामध्ये नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यानंतर पाणी टंचाई भासण्यास सुरुवात होते तर फेब्रुवारी-मार्च मध्ये पाणी टंचाईचे स्वरूप तीव्र होत असते. तालुक्याच्या दुर्गम भागातील गावांना प्रथम पाणी टंचाईची झळ सोसावी लागते.
यावर्षी उदभवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समिती व तहसील प्रशासन सतर्क झाले आहे. लांजा पंचायत समिती प्रशासनाने आतापासूनच तालुक्यातील ग्रामीण भागात वनराई बंधारे बांधण्यास सुरुवात केली आहे. लांजा तालुक्यात एकूण ६०० बंधारे बांधण्यात येणार असून सध्या १७५ वनराई बंधारे बांधुन पूर्ण झाले आहेत. यामध्ये तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना १० बंधारे बंधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. लोक सहभागाच्या आणि श्रमदानातून हे वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. बांधण्यात येणाऱ्या वनराई बंधाऱ्यांमुळे ग्रामीण भागातील गावांमधील पाणी टंचाईची तीव्रता कमी होणार आहे.
दरम्यान पाणी टंचाईग्रस्त गाव व त्यामधी वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे, जलसाठ्यात वाढ करणे, विहिरी दुरुस्ती करणे, नळपाणी योजन दुरु दुरुस्ती, विहिरीचा गाळ उपसा करने, बंधारे बांधणे आदी विषयी चर्चा करून तालुक्याचा संभाव्य टंचाई कृती आराखडा केला जातो. यासह टंचाईग्रस्त गांवे व वाडयांनी प्रस्ताव देणेच्या सुचना करण्यात येतात. संभाव्य आराखड्यामध्ये अंदाजे रक्कम ठरवून तसा कृती आराखडा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात येतो मात्र आराखडा बैठक न झल्याने तत्पूर्वी पंचायत समिती प्रशासनाने बंधारे मोहीम हाती घेतली आहे.
लांजा तालुक्यात प्रथम अती दुर्गम भागातील गावांना पाणी टंचाईची झळ अधिक पोहचत असते. यामध्ये पाणी टंचाईग्रस्त गावांना व त्यामधील वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. गावांच्या मागणीनुसार प्रशासनाकडून पाणी पुरवठा केला जाणार आहे. लांजा तालुक्यामध्ये बंधारे, आणि नव्याने जलस्त्रोत बांधण्यात आल्याने काही अंशी पाणी टंचाईग्रस्त गावे कमी झाली आहेत. सध्या तालुक्यात एकुण ४४ गावे व ९८ वाड्या तहानलेल्याच आहेत. प्रत्येकवर्षी ही गावे व वाड्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. तालुक्यात गतवर्षी पाणी टंचाईग्रस्त गावांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. दोन वर्षांपूर्वी १२६ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात होता.