लांजा : वार्ताहर:-लांजा तालुक्याच्या सहकार क्षेत्रात अग्रणी पतसंस्था असलेल्या लांजा नागरी सहकारी पतसंस्थेला सलग पाचव्यांदा बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार जाहीर झाला आहे.
३१ मार्च २०२४ अखेर एकूण ठेवीस ३० कोटी ते ३५ कोटी पर्यंतच्या विभागातून सलग पाचव्यांदा विविध ठेव विभागातून संस्थेला पुरस्कार जाहीर झाला आहे. पतसंस्थेच्या उल्लेखनीय कामाबद्दल प्रतिवर्षी पतसंस्थेला बँको पुरस्कार प्रदान करण्यात येतात. पुरस्कारांच्या मानांकनासाठी संस्थेतर्फे आवश्यक असलेली प्रश्नावली ३१ मार्च २०२४ या संस्थेच्या कामकाजाबाबत मागविली होती. महाराष्ट्रातील विविध सहकारी पतसंस्थांतून उत्कृष्ट काम करणाऱ्या पतसंस्थांची तज्ञ परीक्षण समितीतर्फे निवड केली जाते. यामध्ये संस्थेला ३० कोटी ते ३५ कोटी ठेवीच्या गटातील २०२४ चा हा बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार जाहीर झाला आहे. ३० जानेवारी २०२५ रोजी लोणावळा येथे मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
संस्थेच्या एकूण ठेवी ३२ कोटी ३९ लाख रुपयांच्या असून २२ कोटी १९ लाख रुपयांचे येणे कर्ज आहे. गुंतवणूक १४ कोटी ७३ लाख, स्वनिधी ४ कोटी सत्तर लाख तसेच सि.डी. रेशोचे प्रमाण ६५.९९%. कर्ज वसुलीचे प्रमाण ९६.८२% आणि सातत्याने संस्थेला अ ऑडिट वर्ग आहे. सभासदांना सतत १० ते १४ टक्के लाभांश दिला जातो. गेली ३४ वर्ष संस्थेने संस्थेच्या सभासद आणि ठेवीदार यांचा विश्वास जपला आहे. संस्थेच्या लांजा शहरासह तालुक्यातील सापुचेतळे, भांबेड, साटवली या तीन ठिकाणी शाखा सुरू आहेत. तसेच संस्थेकडे जामीन तारण कर्ज, व्यावसायिक कर्ज सुरू आहे. तसेच किफायतशीर व्याजदरात सोनेतन कर्ज, वाहन खरेदी कर्ज तसेच हाऊसिंग कर्ज सुरू आहे.
संस्थेकडे सध्या एस.एम.एस., एन.ई.एफ.टी, आर.टी.जी.एस., मनी ट्रान्सफर सुविधा, ऑनलाईन लाईट बिल भरणा केंद्र सुरू आहे. या सर्व सुविधांचा संस्थेचे सभासद ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन शिवाजी कोत्रे, व्हाईस चेअरमन संपदा वाघधरे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर रूमडे व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.
दरम्यान, संस्थेला सलग पाचव्यांदा बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे लांजा शहरासह संपूर्ण तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.