पाली/वार्ताहर:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सेंद्रीय शेतकरी गटाच्या माध्यमातून सामुहिक शेती करण्याचे फायदे शेतक-यांना सर्वाधिक झालेले आहेत.जर सामुहिकपणे सेंद्रीय शेती आधुनिक तंत्रज्ञान वापरुन पारंपारीक बि-बियाणे लागवड पद्धतीचा अवलंब करुन शेती केल्यास रासायनिक घटकांचे अंश जाण्याचे प्रमाणही अत्यल्प राहते. शेतीचे पीक निरोगी येते. सेंद्रीय शेतीची चळवळ तालुक्यांतील विशेषतः ग्रामीण भागातील गावांमध्ये प्राधान्याने राबवून तेथील शेतक-याला सेंद्रीय शेतीव्दारे शाश्वत उत्पन्नातून आर्थिक सक्षम व स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जेणेकरुन समतोल विकास साधत सेंद्रीय शेतीची योजना राबविली गेली पाहिजे असे प्रतिपादन रत्नागिरीचे तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी केले.
डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील रत्ननगरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीने सेंद्रिय शेतीचे दुसऱ्या वर्षातील पहिले प्रशिक्षण पूर्ण केले. सन २०२३ २०२४ मध्ये हातखंबा पंचक्रोशी मधील नऊ गावांमध्ये दहा शेतकरी गट स्थापन करून रत्नानगरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीने नैसर्गिक शेती करण्याचे ठरविले. मागील वर्षी प्रत्येक गटातील चार महिलांनी कोकण कृषी विद्यापीठ दापोली तसेच कृषी विज्ञान केंद्र कणेरी मठ, कोल्हापूर येथे सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेतले. यावर्षीही सर्व गटांमधील सदस्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवळी, हातखंबा, कापडगाव, वेळवंड, पाली, वळके, साठरेबांबर, कशेळीकोंड,नाणीज या गटामध्ये समाविष्ट महिलांना सेंद्रिय शेतीचे गावपातळीवर प्रशिक्षण देण्यात आले.
यामध्ये विविध सेंद्रिय निविष्ठा जसे जीवामृत, दशपर्णी अर्क, गांडूळखत तयार करण्याविषयी माहिती देण्यात आली. वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय स्तरावरून अधिकाऱ्यांनी ही भेट देऊन मार्गदर्शन केले. रत्नागिरीचे तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी नित्यानंद भोसले, तंत्र अधिकारी प्रमोद पाटील तसेच स्मार्ट प्रकल्पाचे तंत्र अधिकारी डांगे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.रत्ननगरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विद्या बोंबले, सचिव सुमंगला पालकर व सर्व संचालक मंडळ यांनीही प्रशिक्षणाचा लाभ घेतला. यावेळी गटाचे सर्व अध्यक्ष, सचिव सर्व गावातील सीआरपी यांनी प्रशिक्षणासाठी सहकार्य केले. प्रशिक्षण कालावधीमध्ये रघुनाथ डवरी यांनी सेंद्रिय शेतीचे तज्ञ प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. हर्षला पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. कृषी पर्यवेक्षक राहुल पाटील आणि कृषी सहाय्यक सागर सांगवे यांनी माती परिक्षण व नमुना घेण्याची पद्धती याविषयी मार्गदर्शन केले.