चिपळूण : चिपळूणहून खेडकडे जाणा-या एका कारला मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट येथे अडवून त्यातील तिघांना 10 जणांनी मारहाण केली होती. या प्रकरणी त्या सर्वांवर गुन्हा दाखल झाला असून त्यातील तिघाना पोलिसांनी अटक केली आहे. तर उर्वरित सातजणाचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. यात काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरो याचाही समावेश आहे.
5 डिसेंबर रोजी रात्री 9.45 च्या सुमारास खेड तालुक्यातील मेटे-मोहल्ला येथे जमिला शहा यांचा मुलगा तारीक याचा वाद झाल्याने साजिदसह शाहिद सरगुरो हे दोघेजण तिथे गेले असता हा वाद पुन्हा वाढला. या वाद मिटावा यातून सलोखा निर्माण व्हावा, यासाठी मुनावर बोट यांच्यासह उस्मान झगडे व महमद अली हे 6 रोजी चिपळूण येथे प्रयत्न करण्यासाठी आले असता हा वाद मिटला नाही. ते पुन्हा कारने खेडच्या दिशेने जात असताना मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात त्यांची कार अडवून साजिद याने लोखंडी रॉडने मुनावर बोट यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. तर शाहिद सरगुरो, फैजल मेमन, मोईन पेचकर, महमद खान, फहद खान, निहाल अलवारे, हनिफ रुमाने, मुजफर इनामदार, शहिबाज दळवी यानी त्या तिघाना मारहाण केली. शिवाय त्या कारच्या काचा देखील फोडल्या.
याप्रकरणी मुनावर बोट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मारहाण करणाऱ्या 10 जणांवर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील निहाल, शाहबाज, मुजफर याना अटक केल्यानंतर त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी प्राप्त झाली आहे. तर उर्वरित सात जणाना अटक झालेली नसून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.