खेड : तालुक्यातील तिसंगी येथील दांडग्या माळ येथील जंगलमय भागात बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू गाळत असताना पोलीस पथकाने देवानंद महिपत भोसले (50, रा. तिसंगी-पिंपळवाडी) यास रंगेहाथ पकडले. या धाडीत 1 लाख 12 हजार 500 रूपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. शनिवारी सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.
देवानंद भोसले हा जंगलमय भागात विनापरवाना गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य जवळ बाळगत गावठी हातभट्टीची दारू गाळत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दारू गाळण्यासाठी 35 हजार रूपये किंमतीची एक मोठी आकारी 1 हजार लिटर लोखंडी पत्र्याची टाकी हस्तगत केली. एका अर्धवट टाकीत गूळ नवसागरमिश्रित गरम रसायन आढळले. पत्र्याची टाकी व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले. 77 हजार रूपये किंमती 500 लिटर मापाच्या काळया रंगाच्या फ्लास्टिकच्या 4 टाक्यांमध्ये गावठी हातभट्टीची दारू तसेच 1500 लिटर गूळ नवसागरमिश्रित तयार केलेले कुजके रसायनही टाकीसह पोलिसांनी हस्तगत केले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत वाघ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.