शेअर मार्केटमध्ये जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष
राजापूर : बेटिंग अॅपवर आणि शेअर
मार्केटमध्ये पैसे गुंतवून जास्त परताव्याचे आमिष दाखवत राजापुरातील एका महिलेची तब्बल ५ लाख ८५ हजार ३०७ रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार नोव्हेंबर महिन्यामध्ये घडला असून, याप्रकरणी दोघांवर राजापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक झालेल्या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार हा प्रकार २४ नोव्हेंबर २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडला आहे. त्यानुसार महिलेच्या मोबाइलवर एका महिलेने फोन करून बेटिंग अॅपवर गुंतवणूक केल्यास कमी वेळात जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्या महिलेने पैसे गुंतवण्यास भाग पाडले असता फिर्यादी महिलेने ४ लाख ८७ हजार ३०९ रुपये भरले. एवढे पैसे भरुन सुद्धा त्या महिलेला जास्त परतावा मिळालाच नाही.
तसेच अरविंद सिन्हा याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास कमी वेळात जास्त परतावा मिळेल असे आमिष दाखविले. त्यानंतर महिलेने ९७,९९८ रुपये भरले. दोघांनी मिळून महिलेची तब्बल ५ लाख ८५ हजार ३०७ रुपयांना ऑनलाइन फसवणूक केल्याचे उघड झाले. याप्रकरणी अरविंद सिन्हा व एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.