लांजा : रस्त्याच्या कामासाठी वास्तव्यास असलेल्या पश्चिम बंगाल येथील दोघा कामगारांनी अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केल्याने यात एका महिला कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना ७ डिसेंबर रोजी तालुक्यातील इंदवटी येथे घडली. सौ.राखी पलाश मोंडल (वय ३३), निताय संजय मंडल (वय ३१, दोन्ही राहणार बेलेमथपार, बानापुर कृष्णगंज, पश्चिम बंगाल) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ.राखी व निताय हे दोघे कामगार इंदवटी येथे बळीराम कबीराज यांच्याकडे रस्त्याची सुरक्षा भिंत बांधण्याचा कामासाठी कामगार म्हणून आले होते व इंदवटी येथेच ते झोपडी बांधून राहत होते. शनिवार ७ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोघांनी अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केले. यामध्ये राखी मोंडल हिचा मृत्यू झाला असून या घटनेची खबर ठेकेदार बळीराम हरिमोहन कबीराज (४३, राहणार लांजा) यांनी लांजा पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. या घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे हे करत आहेत.