चिपळूण : जनता सहकारी बँक. लि. पुणे शाखा चिपळूण यांनी ताबा घेतलेल्या एका सदनिकेचे कर्जदार व गहाणखतदार यांनी बँकेला कोणतीही कल्पना न देता त्याचे कुलुप तोडून घरात प्रवेश केल्याची घटना 22 नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी गुरुवारी चौघांवर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम चांद मुलाणी, एक महिला, अल्ताफ चांद मुलाणी, अस्लम चांद मुलाणी (सर्व-नाझनीन पार्क सोसायटी शबनम अपार्टमेंट) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद श्रीरंग मोहन चितळे (33, बेंदरकरआळी, चिपळूण) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जनता सहकारी बँक. लि. पुणे शाखा चिपळूण यांनी येथील नाझनीन पार्क सोसायटीतील शबनम अपार्टमेंट इमारतीच्या तळ मजल्यावरील सदनिका नं. 1 सील करून त्याचा बँकेने ताबा घेतला होता. बॅंकेचे थकीत कर्जदार सलीम मुलाणी व गहाणखतदार एक महिला, अल्ताफ मुलाणी, अस्लम मुलाणी यांनी कर्ज थकविल्याने त्यानी कर्जास तारण म्हणून नगर परिषद हद्दीतील मिळकतीचा कायदेशीर ताबा बँकेने घेतला. ती मिळकत कुलूप बंद करुन त्यावर सील करुन तशी नोटीस दरवाजावर चिकटवली होती. असे असताना देखील वरील कर्जदार व गहाणखतदार यांनी बँकेला कोणतीही पूर्व कल्पना न देता आपअधिकाराने या मिळकतीच्या दरवाजाला लावलेले कुलूप सील तोडून तसेच नोटीस फाडून या सदनिकेत अनाधिकारे प्रवेश केला. याप्रकरणी त्या चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.