राजापूर : राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेताच राजापुरात भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत व लाडू वाटप करून महायुतीच्या वतीने हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मान्यवरांच्या उपस्थितीत राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी मुंबईत आझाद मैदानावर शपथ घेतली. या शपथविधी सोहळयाचे थेट प्रक्षेपण राजापुरात महायुतीच्या वतीने जवाहर चौकात दाखविण्यात आले. यावेळी फटाके फोडून व जनतेला लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून शिवस्मारकाजवळ एकच जल्लोष करण्यात आला.
याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशफाक हाजू, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अभिजित कांबळे भाजपा तालुका प्रमुख सुरेश गुरव, महिला आघाडी प्रमुख सौ. सुयोगा जठार, सौ. शृती ताम्हनकर, सौ. शीतल पटेल, शितल रहाटे, सौ.रसिका कुशे, भाजपा प्रदेश ओबीसी सेलचे अनिलकुमार करंगुटकर, स्वफ्नील गोठणकर, शिवसेना समन्वयक प्रकाश कुवळेकर, भाजपा युवा मोर्चाचे अरविंद लांजेकर, राजापूर अर्बन बँक संचालक संजय ओगले, विवेक गादीकर, भाजपाचे राजा खानविलकर, महेश मणचेकर, शिवसेना शहर प्रमुख सौरभ खडपे, माजी नगरसेवक रवींद्र बावधनकर, किरण शिवलकर, प्रसन्न मालपेकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथील डॉ.आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.