48 मिनिटांचे अंतर अवघ्या 8 मिनिटात पार करणे शक्य
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीतील दोन्ही बोगदे नव्या वर्षात पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग खात्याने कंबर कसली असून दीडशेहून अधिक कर्मचारी दिवस-रात्र राबत आहेत. बोगद्यापासून काही अंतरावर 2 पुलांच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गर्डर बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून स्लॅब टाकण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे. बोगद्यातील विद्युतीकरणाची कामेही प्रगतीपथावर आहेत. यामुळे नव्या वर्षात दोन्ही बोगद्यातून वाहनालकांचा प्रवास पूर्ण क्षमतेने सुस्साट होणार आहे.
कशेडी बोगद्यातून दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू झाल्यापासून 48 मिनिटांचे अंतर अवघ्या 8 मिनिटात पार करणे शक्य झाले आहे. वाहनालकांचा प्रवास वेगवान अन् आरामदायी झाला असला तरी बोगद्यातील वाहतुकीत ऐनकेन कारणाने अडथळयांचा ‘स्पीडबेकर’ उभा ठाकत आहे.
कशेडी पहिला बोगदा वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने खुला झाला असताना त्यात पावसाळयात गळतीचा अडसर निर्माण झाला होता. राष्ट्रीय महामार्ग खात्याने गळती थोपवल्यानंतर दोन्ही बाजूकडील प्रवास वेगवान झालेला असताना महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर दुसरा बोगदाही वाहतुकीसाठी खुला झाल्याने वाहनालकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र गणेशोत्सवानंतर 20 सप्टेंबर पासून विद्युतीकरण कामासाठी वाहतुकीला ‘ब्रेक’ लागला. त्यानंतर अजूनही दुसऱ्या बोगद्यातील वाहतूक बंदच आहे. यापूर्वी बोगद्यात तात्पुरत्या स्वरूपातील वीजपुरवठा घेवून दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र विद्युतीकरणाच्या कामासाठी गणेशोत्सवापासून वाहतुकीला लागलेला ‘ब्रेक’ अजूनही कायम आहे. सद्यस्थितीत विद्युतीकरणी कामे प्रगतीपथावर असून इतर प्रलंबित कामांनीही वेग घेतला आहे. येत्या 15-20 दिवसातच विद्युतीकरणासह अंतर्गत कामेही पूर्ण होतील, असे सांगण्यात आले.