रत्नागिरी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत विधानसभेवेळी सर्वच गटांमध्ये घटलेली मताधिक्य आणि फितुरीवरून जोरदार राडा झाला. माजी खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्यासमोरच नेते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी तर बैठकीतच पदाचा राजीनामा देण्याचे स्पष्ट केल्याने ठाकरे गटातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. बैठकीत पिछाडी बाबत चर्चा करताना अनेक नवे जुने विषय समोर आले. माजी खासदार आणि ठाकरे गटाचे सचिव विनायक राऊत यांच्या उपस्थितीत संपर्क कार्यालयात तालुका कार्यकारिणीची बैठक झाली. लोकसभेला दहा हजारांचे मताधिक्य असतानाही विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला तेवढी मते मिळाली नाहीत. जवळपास सर्वच जिल्हा परिषद गटात ठाकरे गटाचे उमेदवार पिछाडीवर राहिले यावर चर्चा करताना अनेक जुने नवे विषय कार्यकारिणीच्या बैठकीत समोर आले. जिल्हा पातळीवर नेत्यांच्या अंगावर माजी पंचायत समिती सदस्य धावून गेले सचिवांच्या पुढे हा सर्व ड्रामा सुरू होता. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व संपर्कप्रमुख राजू महाडिक निवडणुकीदरम्यान कुठेच दिसले नाहीत असा आरोप करून तीव्र नाराजी पदाधिकारी यांनी व्यक्त केली.
काही पदाधिकाऱ्यांवर गद्दारीचा आरोप करण्यात आला त्यामुळे बैठकीतील वातावरण चांगलेच तापले होते. उपजिल्हाप्रमुख शेखर गोसावी प्रचंड संतप्त झाले सर्वच पदाधिकाऱ्यांनी बैठकीतून उठत श्रद्धास्थान असलेल्या हातीस येथील पीरबाबा येथे जाऊन गद्दारी बाबत शपथ घेऊया असे सांगितले.पण माजी खासदार राऊत यांनी सर्वांना शांत राहून काम करण्याचा सल्ला देत बैठकीचा नूर पालटण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी एकसंधपणे काम करू व उद्धव ठाकरे यांचा पक्ष अधिक बळकट करू असे सांगितले. या गरमागरम बैठकीची चर्चा रंगली असून गद्दारांवर कारवाई करा अशी मागणी होत आहे. या बैठकीत जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे यांच्यासह विभाग प्रमुख तालुकाप्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.