असा विक्रम करणारे देशातील एकमेव नेते
मुंबई:-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा शपथ घेतली.
अजित पवार यांनी आपल्या कामाने राज्यातील राजकारणावर वेगळी छाप पाडली आहे. शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी राजकारणावर आपली पकड मजबूत केली. पक्षामध्ये आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षविस्तारापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या अजित दादांनी चांगल्या निभावल्या. असा विक्रम करणारे देशातील एकमेव नेते आहेत.
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे नाव असून, त्यांचे चुलते शरद पवार यांच्याप्रमाणेच त्यांनी कृषी, सहकार क्षेत्रात विविध संस्थांचे जाळे निर्माण केले आहे. पवार हे १९९१ मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य झाले. त्यानंतर बारामतीमधून सलग आठवेळा त्यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला आहे. याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी जलसंपदा, ऊर्जा, अर्थ-नियोजनसारख्या खात्यांसह उपमुख्यमंत्रिपदही सांभाळले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये अजित पवार यांनी वेगवेगळ्या सरकारांमध्ये तीनवेळा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने ते सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.
२०१० मध्ये पहिल्यांदा त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर २०१२ मध्ये पुन्हा ते उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर जवळपास चारवेळा ते उपमुख्यमंत्री राहिले आहेत. २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९ या काळात ते औटघटेकेचे उपमुख्यमंत्री बनले हते. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी या पदाची शपथ घेतली. परंतु, हे सरकार अवघ्या ८० तासांत कोसळलं. हे सरकार कोसळल्यानंतर लागलीच ३० नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२ पर्यंत ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. जून २०२३ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून महाविकास आघाडीतून काढता पाय घेतला. त्यानंतर २ जुलै २०२३ ते २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. आज ५ डिसेंबर २०२४ रोजी पुन्हा एकदा मध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहेत.