रत्नागिरी:- आपली स्वप्ने मुलावर लादू पाहणाऱ्या आई-वडिलांमुळे मुलाला आत्महत्या करायला प्रवृत्त होईपर्यंतचा मानसिक ताण होतो. समाजातील पत, पैसा आणि प्रतिष्ठेच्या मोहापायी विस्कटून जाणाऱ्या अशा कौटुंबिक मानसिकतेचे दर्शन स्वप्नपक्षी या नाटकात घडते.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ६३ वी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात पार पडली. स्पर्धेत एकंदर आठ नाटके सादर झाली अखेरचे स्वप्नपक्षी नावाचे नाटक सादर करण्यात आले. या नाटकात आजकालच्या कौटुंबिक परिस्थितीचे वर्णन टिपण्यात आले आहे. गगनाला पंख नवे पंखाना बळ हवे, हा विचार मांडणारे आणि वर्तमानकालीन वास्तवाला भिडणारे हे नाटक आजच्या कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्थेवर भाष्य करते. मुलाची क्षमता, आवड, मन, भावना यांचा विचार न करता निष्ठूरतेने करिअर घडविण्यासाठी आत्मकेंद्रित झालेली कुटुंबव्यवस्था आणि पालकांच्या अहंकाराच्या दबावाखाली कुस्करली जाणारी नवीन पिढी यांचा हा सनातन संघर्ष आहे. झापडबंद विचारसरणी, साचेबंद व्यवस्था आणि त्याला झिडकारून टाकू बघणारी नवी उमेद यांची कहाणी या नाटकात दिसते. आजची दिशाहीन झालेली पिढी आणि त्याला कारणीभूत असलेले पालक यांचे हे दर्शन आहे. एखाद्या क्षेत्रात दरवेळी येणारी लाट आणि त्यात वाहून जाणारा समाज अजूनही दिसतो. अशावेळी पंखांना बळ देण्याऐवजी ते पंख स्वार्थासाठी कसे वापरता येतील, हा विचार करणारा समाज नाटकात दिसतो.
नंदय्या (आयुष पंडित) या बारावीची परीक्षा देणार असलेल्या मुलाला त्याची आई वैशाली (सौ. प्रज्ञा रायकर-जोशी) अभ्यासाचे वेळापत्रक ठरवून देते. खाणे पिणे तोलून मापून केले जाते. आपण स्वतः डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेले आईने ते अपुरे स्वप्न मुलाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे ठरविलेले असते. आई किटी पार्टी आणि वडील विशाल (प्रदीप तेंडुलकर) स्वतःच्या विश्वात पार्ट्या, शेअर मार्केट, इत्यादीमध्ये गुंतलेले असतात. त्यांना मुलाशी संवाद साधायला वेळच नसतो, मुलाने मोबाइलचा वापर करू नये यासाठी घराला जामर बसविलेला असतो. मुलाचे मनःस्वास्थ्य चांगले राहावे, यासाठी त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडेही नेले जाते. त्याने प्रत्येक परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळवावेत, तो कायम टॉप रँकिंगमध्ये असावा, त्याचे करिअर चांगले घडावे, त्याने उत्तम डॉक्टर व्हावे, देशभरात त्याचे नाव व्हावे यासाठी आई आणि वडिलांचा आटापिटा असतो. वडिलांचे मुलाकडे लक्ष नसले तरी मुलगा डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून धडपडणाऱ्या बायकोला ते सर्व ते आर्थिक पाठबळ पुरवत असतात. या साऱ्याने मुलगा मात्र वैतागून आणि गांजून गेलेला असतो . त्याला कलाकार व्हायचे असते.
या साऱ्या घुसमटीमध्ये त्याला रिंकू (कु. राधा दाते) नावाची वर्गमैत्रीण भेटते. तिलाही तिच्या आई-वडिलांकडून अभ्यासाचे दडपण आलेले असतेच. नंदय्याचे आजोबा शामराव (मनोहर जोशी) हे मात्र या साऱ्यामध्ये सुवर्णमध्य साधायच्या प्रयत्नात असतात. त्यांना नातवाची तडफड कळत असते. पण मुलगा आणि सून आपले ऐकणारच नसतात, हे त्यांना माहीत असते म्हणून असते. स्वतःहून भव्य बंगल्यामध्ये न राहता आऊट हाऊसमध्ये राहणे पसंत करतात. पण ते घरात येऊन जाऊन असतात. नातवाला आणि त्याची मैत्रीण रिंकूलाही समजून घेतात.
मुलाच्या मैत्रिणीचे रिंकूचे वडील मोठे उद्योगपती असतात. मुलाची तिच्याशी झालेली मैत्री आपल्यासाठी उपयुक्त आहे, हे लक्षात घेऊन स्वार्थी हेतूने मुलाचे वडील नंदय्या आणि रिंकूची मैत्री वाढावी यासाठी प्रयत्न करत असतात. त्यासाठी पत्नीचीही मदत ते घेतात. मैत्री कायम राहावी यासाठी ते नंदय्या आणि रिंकू यांचा विवाह लावून देण्याचे ठरवितात आणि त्यांचा वाङ्निश्चय करण्याची तयारी करतात. मानसिक ताण असह्य झालेला नंदय्या आत्महत्या करायला निघून जातो. मुलाने आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर ते व्यथित होतात, पण मुलाच्या जाण्यामुळे नव्हे, तर तो गेल्यामुळे त्याच्या मैत्रिणीच्या वडिलांशी निर्माण होऊ शकणारे संबंध आणि आपली आर्थिक प्रगती रोखली जाणार याचे त्यांना वाईट वाटत असते. आई मात्र या धक्क्याने खूपच व्यथित होते. तीन महिन्यानंतर मुलगा प्रकट होतो, तेव्हा आपण त्याच्या मनाविरुद्ध काहीही करणार नसल्याचे ती ठरवून टाकते.
बारावीत असणाऱ्या म्हणजे लग्नासाठी पात्र वय नसलेल्या मुलाचा विवाह ठरविणे, आपण जिवंत असल्याची जाहिरात वृत्तपत्रांमध्ये देऊन काहीतरी वेगळे घडविल्यानंतर आपण घरी परतणार असल्याचे त्यात नमूद करणे, प्रत्यक्षात जाहिरात प्रसिद्ध होते आणि तिचे वाचन होते त्याच दिवशी मुलाने घरी परतणे अशा काही गोष्टी खटकतात. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेले हे नाटक मनोहर जोशी यांनी दिग्दर्शित केले आहे. प्रदीप तेंडुलकर यांचे देखणे नेपथ्य नाटकाची रंगत वाढवते. त्यांना मोहन धांगडे, किशोर नेवरेकर, सुधाकर घाणेकर, संजय लोगडे, सौरभ लोगडे यांनी साह्य केले आहे. या नाटकालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. एकूण ८५२ प्रेक्षकांनी १२ हजार २८० रुपयांची तिकीट खरेदी केली.