हैद्राबाद:-अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा पुष्पा 2 : द रुल’ हा चित्रपट आज जगभरात प्रदर्शित झाला आहे. ४ डिसेंबर रोजी पुष्पा २ च्या प्रीमियर शोचं आयोजन करण्यानं आलं होत.
त्या प्रीमियर शोसाठी अल्लू अर्जुन उपस्थित राहणार होता. ठरल्याप्रमाणे अल्लू अर्जुन त्याठिकाणी दाखल झाला. मात्र यावेळी त्याला पाहण्यासाठी हैदराबादमधील थिएटरबाहेर प्रचंड गर्दी जमली आणि चेंगराचेंगरी झाली. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी उसळलेल्या गर्दीत एक महिला ठार झाली आहे तर तिची दोन मुलं गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेचे अंगावर शहारे आणणारे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिलसुखनगर राहणारी रेवती पुष्पा २ चा प्रीमियर शो पाहण्यासाठी पोहोचली होती, त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत तिचा मृत्यू झाला. मृत महिला पती भास्कर आणि दोन मुलांसह चित्रपटाच्या प्रीमियरला गेली होती. रात्री १०.३० च्या सुमारास गोंधळ उडाला, जेव्हा स्क्रिनिंगला उपस्थित असलेला चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती. त्यावेळी तिथे प्रचंड चेंगराचेंगरी झाली. यावेळी पोलीस आणि आसपासचे लोक पीडितेला मदत केली. रेवतीला रुग्णालयात नेण्यापूर्वी तिला सीपीआर देण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. मात्र, तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मुलाची प्रकृती चिंताजनक आहे, तर रेवतीचा जागीच मृत्यू झाला.
अल्लू अर्जुन ची मोस्ट अवेटेड मूव्ही ‘पुष्पा 2 : द रुल’ आज जगभरातील थिएटर्समध्ये रिलीज केली जाणार आहे. पण, रिलीजच्या एक दिवस अगोदर हैदराबादच्या प्रीमियर शोमध्ये घडलेल्या दुर्घटनेमुळे रिलीजचा आनंदावर काहीसं विरझण पडलं आहे. माहितीनुसार, जेव्हा अल्लू अर्जुनच्या येण्याची माहिती मिळाली, त्यावेळी जमलेली गर्दी अनियंत्रित झाली. अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी, त्याच्या जवळ जाण्यासाठी लोकांनी हाणामारीही सुरू केली. त्यावेळी पोलिसांना नाईलाजास्तव लाठीचार्ज करावा लागला. काही वेळातच पोलीस आणि सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात अल्लू अर्जुन तिथून निघून गेला. सुकुमार यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘पुष्पा: द राइज’चा ‘पुष्पा 2: द रुल’ सिक्वेल आहे. हा चित्रपट १० हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. पोस्ट-प्रॉडक्शन विलंबामुळे 3D आवृत्तीचं प्रकाशन शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आलं. यात अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदाना, फहद फासिलसह अनेक स्टार्स आहेत.