रत्नागिरी : थकबाकीमुळे वीजजोडणी तोडलेल्या ग्राहकांसाठी महावितरण कंपनीने अभय योजनेला ग्राहकांच्या मागणीनुसार मुदतवाढ दिली आहे.
३१ डिसेंबर २०२४ पर्यंत याला मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सव्वासातशे वीजग्राहकांना त्याचा फायदा घेता येणार आहे. या ग्राहकांकडून सुमारे २६ लाख ४० हजार थकबाकी आहे. अभय योजनेत मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यात भरायची सवलत ग्राहकांना देण्यात आली आहे.
महावितरणच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या (पीडी) ग्राहकांसाठी १ सप्टेंबरपासून अभय योजना सुरू केली होती. योजनेचा कालावधी ३० नोव्हेंबरला संपला; परंतु कंपनीने या योजनेला एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे योजनेत अजूनही सहभागी होऊ इच्छीणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. संबंधित वीजग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येणार आहे.