रत्नागिरी:-जेवणातील कढीपत्त्याप्रमाणे आपल्या आई-वडिलांना आजकालच्या मुलांनी आपल्या जीवनातून बाजूला करू नये, असा संदेश देणारे कढीपत्ता नावाचे कौटुंबिक प्रबोधनात्मक नाटक राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरी सादर करण्यात आले.
रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेली ६३ वी राज्य हौशी मराठी स्पर्धा सुरू आहे, स्पर्धेतील सातवे नाटक कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघाने सादर केले. अनिल काकडे यांनी लिहिलेल्या या नाटकाला प्रसाद धोपट यांनी दिग्दर्शनातून उत्तम न्याय दिला आहे.
जेवणात कढीपत्त्यामुळे जेवणाला स्वाद येतो. तितकेच महत्त्व कुटुंबात आई-वडिलांना असते. जेवणातील कढीपत्ता सर्वांत आधी फोडणीला घातला जातो आणि प्रत्यक्ष जेवताना मात्र तो सुरुवातीलाच काढून टाकला जातो. आजकालची तरुण मुले कढीपत्त्याचा स्वाद विसरतात आणि आई-वडिलांना दूर करतात. ते तसे त्यांनी करू नये, कढीपत्त्याचा स्वाद कायम राखण्यासाठी आई-वडिलांना आपल्या जीवनात स्थान दिले पाहिजे, असा संदेश कढीपत्ता या नाटकाने दिला आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात तरुण मुलांना वाटते की आपले वडील आपल्याला विसरले, पण आपली मुले मोठी होऊन समाजात त्यांचे नाव व्हावे, त्यांची स्वप्न पूर्ण व्हावीत, म्हणून आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवून पोटाला चिमटा घेऊन आईवडील सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. पण आपल्याला पाहिजे तेव्हा सगळे मिळते, म्हणून आपली गरज संपल्यानंतर मुले त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना कढीपत्त्यासारखे आपल्या आयुष्यातून बाजूला काढतात. वेळ प्रसंगी मुलांकडून चुका झाल्या तर त्यांच्यासाठी कठोर निर्णय घेणारे आई-वडीलच असतात. केवळ आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी ते असे पाऊल उचलतात. कढीपत्ता जेवणाला चव आणतो तसे प्रत्येकाने आई-वडील मुलांच्या आयुष्यात आनंद वाढत असतात. आपल्या स्वार्थासाठी त्यांना अलगद कढीपत्त्यासारखे बाजूला काढू नये. आजच्या परिस्थितीनुसार या नाटकाची कथा असून आई-वडील आणि मुले यांच्या नातेसंबंधावर भाष्य करणारे हे नाटक आहे.
सर्व तंत्रज्ञ आणि कलाकारांनीही आपापल्या परीने प्रामाणिकपणे आपापल्या भूमिका निभावल्या आहेत. या नाटकातील आईचे पात्र प्रमुख असून तिच्याभोवती हे नाटक फिरताना दिसते. नाटकातील काही प्रसंग नाटकाची उत्कंठा वाढवतात. स्वतःच्या मुलाप्रमाणेच ज्याचा सांभाळ केला तो मुलगा अनाथाश्रमातून आणलेला असतो, हे शेवटपर्यंत मुलाला कळत नाही, पण मुलाच्या बायकोला म्हणजे सुनेला मात्र ते कळते. त्यानंतर मुलाच्या वागण्यात बदल होतो आणि घरातून बाहेर जायला सांगणारी आई मुलगा आणि सुनेचा पुन्हा एकदा घरात स्वीकार करते आणि नाटकाचा शेवट होतो.
नाटकातील रमा ही महत्त्वाची भूमिका आमिषा देसाई यांनी उत्तम साकारली आहे. या आईला स्वानंद (राहुल कासले) याचे खूपच वेड असते. निवृत्त प्राध्यापिका असलेली आई मुलाच्या लग्नानंतरही मुलावर आपलाच अधिकार गाजवते. त्याला हवे नको पाहत असते. वेळच्यावेळी त्याला नोकरीच्या ठिकाणी डबा पोहोचवत असते. कपड्यांना इस्त्री करण्यापासून त्याची वैयक्तिक सर्व कामे सुनेने करण्याऐवजी ती स्वतःच करत असते. आईच्या या पुत्रवेडाचा गैरफायदा स्वानंद घेतो. वास्तविक त्याला स्वतंत्रपणे राहण्यासाठी आईनेच वडिलांच्या नकळत दुसरे घर खरेदी करून दिलेले असते. तरीही मुलाचे वर्तन चांगले नसते. त्याची नोकरी जाते. जुगारात तो पैसे हरतो आणि लक्षावधी रुपयांचे मित्रमंडळींचेच कर्ज करून ठेवतो. कर्जाचे हप्ते थकल्यामुळे त्याच्या घरावर जप्तीही येते. पण हे सारे त्याने आई-वडिलांपासून लपविलेले असते. आपण सांगू ते आई ऐकते, याचा गैरफायदा त्याने घेतलेला असतो. त्याच्या वाह्यात वागण्यामुळे त्याला घरातून आई-वडिलांनी बाहेर काढलेले असते. पण तरीही आई त्याला हवे ते सर्व पुरवत असते. एके दिवशी तो आईला पन्नास हजार रुपयांची गरज असल्याची मागणी करतो. आपण नको, तर आपले पैसे मुलाला हवेत, हे लक्षात आल्यानंतर आईचे डोळे उघडतात. मुलाला तीच घराबाहेर काढते. पण वर्षभरानंतर मुलाच्या वागण्यात सुधारणा होते आणि तो घरी परततो.
वडील माधव (प्रसाद धोपट) परी (गार्गी सावंत), आर्वी (प्रीती देसाई) शार्दूल आणि राकेश (प्रतीक राजेशिर्के) या सर्वांच्या भूमिका उत्तम झाल्या आहेत.
नेपथ्याची निर्मिती तारक कांबळी आणि मंडळी या मालवणच्या संस्थेने केली आहे. प्रकाशयोजना (आदित्य दरवेश) पार्श्व संगीत (नंदलाल रेळे, रूपेश जगताप), रंगभूषा (नरेश पांचाळ), वेशभूषा (पूजा धोपट), रंगमंच व्यवस्था (प्रणव धोपट, प्रतीक राजेशिर्के) या तांत्रिक बाजूंसह नाटक सर्वच दृष्टीने योग्य वठले आहे. स्पर्धेत सादर झालेल्या सात नाटकांमध्ये हे नाटक सर्वांत उजवे ठरले.