स्वयंसेवक ते सीएम झंझावाती राजकीय प्रवास
मुंबई:-राज्यात 2019 चे निवडणूक निकाल लागल्यापासून घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उद्या, गुरुवारी शपथ घेतील.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकनिष्ठ स्वयंसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा झंझावाती राजकीय प्रवास राहिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी नागपुरात झाला. सरस्वती विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादित केली. त्यानंतर पुढे बर्लिन येथे व्यवसाय व्यवस्थापन आणि प्रकल्प व्यवस्थापन पद्धती आणि तंत्र पदविकेचे शिक्षण घेतले. शिक्षण सुरू असतानाच 1989 साली नागपुरात वॉर्ड संयोजक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. तसेच त्यांच्याकडे 1990 मध्ये नागपूर पश्चिम विधानसभा क्षेत्रात कार्यकारिणी सदस्य म्हणून जबाबदारी आली. त्यानंतर ते 1992 ते 1997 नागपूर महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेत. त्यानंतर 1997 ते 2001 दरम्यान सर्वात कमी वयाचे महापौर म्हणून त्यांनी काम केले. उत्तम वक्तृत्त्व, दांडगा अभ्यास आणि प्रचंड लोकसंग्रह याबळावर 1999 मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडणून आलेत. त्यानंतर 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 मध्ये सलग सहाव्यांदा ते आमदार म्हणून विजयी झालेत.
यासोबतच फडणवीस हे 2014 ते 2019 दरम्यान सलग 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री ठरले. त्यानंतर शिवसेनेकडून धोका मिळाल्यामुळे 2019 मध्ये त्यांना दुसऱ्यांदा मिळालेली मुख्यमंत्रीपदाची संधी औटघटकेची ठरली. अवघ्या 3 दिवसात फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला. परंतु, करोना साथरोगाच्या काळात विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका ऐतिहासीक ठरली. एकीकडे राज्यातील जनतेशी संपर्क कायम ठेऊन ग्रासरूटवर काम करीत असताना त्यांनी अडीच वर्षे सातत्याने महाविकास आघाडीचे वाभाडे बाहेर काढलेत. तर 2022 मध्ये शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन महायुतीचे सरकार अस्तित्वात आले. या सरकारमध्ये शिंदेंकडे मुख्यमंत्री पदाची धुसा सोपवून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम करणे पसंत केले.
याच काळात लाडकी बहिण योजना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्कातील सातत्य या बळावर फडणवीस यांच्या नेतृत्त्वात 20 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला. राज्यात 2019 मधील निवडणुकीच्या प्रचारात “मी पुन्हा येईल” या फडणवीसांच्या वाक्याची विरोधकांनी प्रचंड टवाळी केली. परंतु, फडणवीसांनी टीकाकारांच्या तोंडी न लागता आपल्या कामावर फोकस करत सत्तेत कमबॅक केले आणि आपले “मी पुन्हा येईल” हे वाक्य खरे करत शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन ते बहुमताने सत्तेत परतले.