आठ दिवसांत अतिक्रमण हटविण्याच्या सूचना
राजापूर:-राजापूर बाजारपेठेतील अतिक्रमण हटाव मोहिमेच्या अनुषंगाने मंगळवारी राजापूर नगर परिषदेच्यावतीने बाजारपेठेत फेरफटका मारून सूचना देण्यात आल्या. आठ दिवसात व्यापाऱ्यांनी स्वतहून अतिक्रमण न हटविल्यास थेट साहित्य जप्त करण्याचा इशारा नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
राजापूर नगर परिषदेने जनतेच्या करातूनच लाखों रूपये खर्च करून शहरात मच्छीमार्केट आणि भाजीमंडई उभारली आहे. तरीही सगळेच संबंधित व्यावसायिक आधीच अरूंद असलेल्या बाजारपेठेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर ठाण मांडून असतात. नगर परिषद इमारतीच्या मागील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता तर मच्छीमार्केट बनला आहे. तेथून चालताना जनतेला दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतून शहरात येणारी जनता तर नगर परिषदच्या कारभारावर ताशेरे ओढत असतात. शहर बाजारपेठेत असलेल्या रस्त्यावर झालेली अतिक्रमणे, त्यातच दुकानाच्या बाहेर उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांमुळे बाजारपेठेतून चालणे देखील अवघड बनते.
त्यामुळ बाजारपेठेतील अतिक्रमणांमुळे राजापूर नगरपरिषदेला नेहमीच जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. अतिक्रमणांच्या बजबजपुरीने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या वारंवारच्या तक्रारींनंतर आता राजापूर नगर परिषदेने बाजारपेठेतील स्वैर अतिक्रमणे आणि ठराविक व्यापाऱ्यांच्या अतिक्रमण मुजोरीला पायबंद घालण्यासाठी पावले उचलली आहेत. नगरपरिषदेच्या आरोग्य प्रशासनाने मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबवत अतिक्रमण करणाऱ्यांना आगामी आठ दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर मात्र थेट साहित्यच जप्त करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.