मुंबई:-बंगालच्या उपसागरातील ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे संपूर्ण राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या चक्रीवादळाचा प्रभाव आपल्याला राज्यात काही ठिकाणी पाहायला मिळत आहे.
मुंबईत बुधवारी पहाटे काही भागात हलक्या सरी कोसळल्या. राज्यात मागील 3 दिवसांपासून ढगाळ व दमट हवामान आहे. यादरम्यान भारतीय हवामान विभागानं राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, घाटमाथा, सोलापूर, सांगली, सातारा, लातूर आणि धाराशीव या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज आहे. 30 ते 40 किमी ताशी वेगानं वारे वाहतील, हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट दिला आहे. तसेच उर्वरित महाराष्ट्रात तापमान कोरडं, ढगाळ असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
थंडीसाठी अजून थोडी वाट बघावी लागणार
कडाक्याची थंडी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्या पडेल असा अंदाज होता. मात्र अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. १५ डिसेंबरनंतर पुन्हा राज्यात तापमानाचा पारा उतरण्याची शक्यता आहे. त्यानंतर थंडीचा जोर वाढेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शेतकरी धास्तावले
यादरम्यान शेतकऱ्यांना आता आपल्या शेतमालाची काळजी वाटू लागली आहे. अनेकांनी शेतमाल विकण्यास काढला आहे. तसेच या हवामान बदलामुळे रब्बी पिकांवार किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे यामुळे बळीराजा धास्तावला आहे.