लांजा : देव दिवाळीचे औचित्य साधून गांगोवाडी ग्रामविकास मंडळ, साटवलीच्यावतीने रात्रीच्या वेळी हजारो दिवे पेटवून ते साटवली येथील ऐतिहासिक गढीवर ठेवले. या दिव्यांच्या प्रकाशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साटवली गढी उजळून निघाली. तर एक वेगळ्या आध्यात्मिक वातावरण निर्माण झाल्याची अनुभूती मंडळाला मिळाली.
छत्रपती शिवरायांच्या काळात जलमार्गे मालाची ने-आण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणारे व त्या काळात तालुक्यातील प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून उदयास आलेले तालुक्यातील साटवली येथील ऐतिहासिक बंदर आणि गढीकडे पुरातत्त्व विभागाचे तसेच स्थानिकांचे दुर्लक्ष झाल्याने सद्यस्थितीत ही गढी अखेरची घटका मोजत आहे. मात्र दुर्गवीर प्रतिष्ठान, शिवगंध प्रतिष्ठान लांजा व साटवली गावातील स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने साटवली किल्ला संवर्धनाच्या दृष्टीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येते.
शिव प्रेमाने प्रेरित होत साटवली गांगो वाडीतील तरुणांनी देवदिवाळीचे निमित्ताने आपल्या देवस्वरुप राजांची, ज्यांच्यामुळे आज देवळात देव आहेत. त्या देवाची गढी हजारो दिव्यांनी प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आणि तो प्रत्यक्षात अंमलात आणला. गांगोवाडी ग्रामविकास मंडळाने एक दिवा राजांसाठी हा उपक्रम राबविताना हजारो दिव्यांची आरास गढीवर केली. या दिव्यांच्या प्रकाशाने गढी उजळून निघाली होती. मनामनात, रक्तात वसलेले राजे आज जणू या दिव्यातून गढीवर अवतरलेले भासत होते. घरातल्या देवांची भक्तिभावाने रोजच पूजा होत असते. मात्र ज्यांच्यामुळे आम्ही आहोत त्या देवाची आजची पूजा येणाऱ्या पिढ्यांना देखील आपल्या सुवर्ण इतिहासाची कथा माहित करून देत यश मिळवायला प्रेरणा देईल. हे या उपक्रमावरुन दिसून आले.