रत्नागिरी : भाडेतत्त्वावर घेतलेला रोड रोलर मालकाला परत न करता तो परस्पर विकणाऱ्या आरोपीला कोल्हापुरातून अटक करण्यात आली. मुराद अलनशीर हवालदार (रा. टिंबर मार्केट, कोल्हापूर) असे आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला ४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरीतील नाचणे येथे राहणाऱ्या छाया चौधरी यांच्या मालकीचा रोड रोलर (क्र. एमएच०८-२२५४०) मुराद हवालदार याने तीन वर्षांपूर्वी भाडेतत्त्वावर घेऊन परस्पर विकल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. विशेष सहायक सरकारी वकील निलांजन नाचणकर यांनी रोड रोलर हस्तगत करण्यासाठी आणि आरोपीचे सहकारी शोधण्यासाठी पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने मागणी मान्य करून ४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश केले.