रत्नागिरी : जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचा वापर, दुरुस्ती व सुशोभीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जागतिक शौचालय दिनानिमित्ताने १४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर यादरम्यान विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. आमचे शौचालय आमचा सन्मान या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी केले.
नादुरुस्त शौचालय वापरात आणावे शिवाय पाण्यासाठी नळजोडणी तसेच वीजजोडण्याची व्यवस्था करणे त्याचप्रमाणे दरवाजा कडीकोयंडाशिवाय फरशी, छत दुरुस्ती आदी बार्बीवर भर देऊन आपले शौचालय उत्कृष्ट करावे, यासाठी ही जनजागृती मोहीम आयोजित केलेली आहे.
५ डिसेंबरपर्यंत प्रत्येक गावात अशाप्रकारे शौचालय याच्या निर्मितीसाठी विशेष गृहसंपर्क व भेटीचे आयोजन करण्यात येणार आहे. नादुरुस्त शौचालय शोधून त्याची दुरुस्ती करण्याचे आवाहन देखील ग्रामपंचायत स्तरावर ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती करणार आहे. गावातील या मोहिमेदरम्यान उत्कृष्ट शौचालय निर्माण केलेल्या दोन कुटुंबांना ग्रामस्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे तसेच या दोन कुटुंबांची नावे पंचायत समितीमार्फत जिल्हास्तरावर सन्मानासाठी नामनिर्देशन करण्यासाठी पाठवणार आहेत. उत्कृष्ट शौचालयांपैकी ५ कुटुंबांची निवड जिल्हास्तरावरती होणार असून, त्यांचा सन्मान जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात सर्व सार्वजनिक शौचालयाची देखील याच पद्धतीने दुरुस्ती करून देण्याच्यादृष्टीने जनजागृती मोहीम घेण्यात येणार आहे. तीन उत्कृष्ट शौचालयांची माहिती जिल्हास्तरावर प्राप्त होणार आहे. प्राप्त झालेल्या सर्व प्रस्तावांची व शौचालयाची पाहणी केल्यानंतर त्यातील तीन सर्वोत्कृष्ट शौचालयांचा निर्मितीकरिता परिश्रम घेतलेल्या घटकांचा सन्मान जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे.