आंदोलनामुळे दिल्ली मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
दिल्ली:-दिल्लीच्या दिशेने निघालेले हजारो शेतकरी आंदोलक उत्तरप्रदेशच्या नोएडा सीमेवर पोहचले आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान आंदोलनामुळे दिल्ली-नोएडा मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
नोएडा सीमेवर ठिय्या दिलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले की, आता राज्य सरकारशी चर्चा करणार असून, चर्चा निष्फळ ठरली तरच दिल्लीकडे कूच केली जाणार आहे. दरम्यान, दिल्लीच्या चिल्ला बॉर्डर, यूपी गेट, कालिंदीकुंज येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांना दिल्लीकडे मोर्चाची घोषणा केल्यानंतरच वाहतूक मार्ग वळवण्यात आला. नोएडाच्या सेक्टर 15 ए ते दिल्ली आणि कालिंदीकुंज ते चिल्ला बॉर्डरमार्गे दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.सकाळपासून नागरिकांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. आज सोमवार असल्याने लाखो लोक कार्यालयात आले आहेत. मात्र, त्यांना परतीच्या प्रवासादरम्यान प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महामाया उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाली आहे.
लोकांना वाहतूक कोंडी टाळता यावा म्हणून वाहतूक पोलिसांनी आधीच सूचना जारी केल्या होत्या. दरम्यान, शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले. त्यावेळी त्यांनी महामार्गावरच आंदोलन सुरु केले. शेतकरी सातत्याने घोषणा देत आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मीडियाशी बोलताना पूर्व दिल्लीचे डीसीपी अपूर्व गुप्ता म्हणाले, आम्हाला आधीच काही शेतकरी संघटनांबद्दल माहिती मिळाली होती. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने त्यांना आंदोलन करण्यासाठी दिल्लीत येण्याची परवानगी दिली नाही. नवी दिल्ली परिसरात बीएनएसचे कलम 163 लागू करण्यात आले आहे. पोलिस सहआयुक्त संजय कुमार यांनी शेतकऱ्यांच्या दिल्ली चलो मोर्चसंदर्भात विविध ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली.