शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव घ्यावाच लागेल
शिक्षण विभागाच्या सूचना; विद्यार्थ्यांची जबाबदारी शाळेची
रत्नागिरी : शिक्षकांनी विद्यार्थांच्या सहली काढताना शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव घ्यावाच लागेल असे शिक्षण विभागाने सांगितले आहे. शालेय सहलींचे होणारे अपघात लक्षात घेऊन शिक्षण विभागाकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती शाळा समिती यांच्या संमतीच्या ठरावानेच शैक्षणिक सहल काढली जावी, अशी सूचना दिली आहे. तसेच त्या सहलीतील विद्यार्थ्यांची जबाबदारी पूर्णतः शाळेची राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे.
सर्व माध्यमांच्या, तसेच सर्व मंडळाशी संबंधित शाळातील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयाचे ज्ञान मिळावे, भौगोलिक, सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पाहण्यास मिळाव्यात व त्यांची माहिती मिळावी यासाठी शैक्षणिक वर्षामध्ये शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येते. ही सहल आयोजित करताना दक्षता घेण्यासाठी नियमावली सूचना शिक्षण विभागाकडून बनवण्यात आली असून,
त्याचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यामध्ये वर्षात एकच शैक्षणिक सहल आयोजित करण्यात यावी. विद्यार्थ्यांना सहलीला येण्याची सक्ती करण्यात येऊ नये, विद्यार्थी व पालकांचे संमती पत्र घेण्यात यावे, सहभागी विद्यार्थ्यांची यादी व संपर्क क्रमांक सोबत संलग्न करण्यात यावा. शाळा व्यवस्थापन समिती शाळा समिती यांच्या संमतीचा ठराव घेऊनच सहल काढली जावी. सहलीसाठी दहा विद्यार्थ्यांसाठी एक या प्रमाणात शिक्षकांची संख्या असावी, या नियमांचा समावेश आहे. तसेच वैद्यकीय तपासणी केल्याचे विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट अत्यावश्यक करण्यात आले आहे.
याशिवाय, विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी संबंधित विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी, तसेच सहलीतील सर्व शिक्षकांची राहील. सहलीस विद्यार्थिनींचा सहभाग असल्यास महिला शिक्षिका सोबत असणे अत्यावश्यक राहील. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसनेच सहल नेण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी जादा शुल्क आकारू नये, असा सूचनाही देण्यात आल्या आहेत.