दापोली : दापोली तालुक्यातील चंद्रनगर येथील घाणेकरीण देवी मंदिरातील दानपेटी 30 नोव्हेंबर रोजी चोरट्यांनी फोडली. सदर घटना सकाळी सात वाजता लक्षात आल्यावर पोलिसांनी अवघ्या पाच तासांमध्ये मंदिर दानपेटीतील ६ हजार ५० रुपये चोरणाऱ्या महेंद्र सिताराम पवार (वय ४७, रा. जालगाव, पांगारवाडी, ता. दापोली) या संशयित गुन्हेगाराला अटक केली आहे. शिवाय त्याच्याकडून चोरीस गेलेल्या रकमेपैकी ५ हजार ७७० रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे.
दापोली पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमोल बनकर, हेडकॉन्स्टेबल अजित गुजर, पोकॉ. मिथुन मस्कर यांनी केली.
दापोली तालुक्यातील चंद्रनगर येथील घाणेकरीन देवी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने फोडून आतील सुमारे 6050 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला होता. तसेच मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडल्याची घटना दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी उघडकीस आली.
याबाबत दापोली पोलीस स्थानकात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चंद्रनगर गावातील घाणेकरीन मंदिराचे पुजारी यशवंत देवजी मुलुख हे सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे मंदिरात गेले असता त्यांना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे तुटलेले आढळून आले . मंदिराच्या गाभाऱ्यातील दरवाज्याच्या कोयंडा तुटलेला आढळला. गाभाऱ्यात असलेली दानपेटी उघडी असल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती तात्काळ मंदिर कमिटी आणि गावातील लोकांना दिली.
दापोली पोलिसांनी केवळ पाच तासात आरोपीला बेड्या ठोकल्याने दापोली पोलिसांचे कौतुक होत आहे.