नगरपरिषदेने दिले पत्र, भाजपच्या मागणीला यश
रत्नागिरी : शहरातील नाचणे, सहकारनगर येथून पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीची गळती थांबवण्यासाठी उपाययोजना करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा रत्नागिरी भाजपाने दिला होता. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली. याची तत्काळ दखल घेत नगरपरिषदेने शहर भाजपाला दुरुस्ती करण्याबाबतचे पत्र दिले आहे. यामुळे भाजपच्या मागणीला यश आले आहे.
दोन दिवसांपूर्वी नाचणे, सहकारनगर येथे पाण्याची टाकीला गळती लागल्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी संपर्क साधल्यानंतर भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तेथे पोहोचले. त्यानंतर माहिती घेतली आणि गळती काढण्यासाठी तत्काळ नगर परिषद प्रशासनाशी संपर्क साधला. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला होता. याची दखल नगर परिषदेने घेतली आणि याबाबतचे पत्र भाजपा शिष्टमंडळाला दिले.
नगरपरिषदेने भाजपाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सहकारनगर येथील पाण्याच्या टाकीला होत असलेल्या गळतीच्या पार्श्वभमीवर आमदार उदय सामंत यांनी जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत टाकीचे काम करण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कामाचा कार्यादेश अभिकारक माना इलेक्ट्रीकल अॅंड इंजिनिअरिंग सर्विसेस, ठाणे यांना २८ ऑगस्ट रोजीच्या पत्रान्वये देण्यात आला आहे. येत्या ७ दिवसामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्याबाबत अभिकारकास सूचित करण्यात येत आहे, असे पत्र नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिले आहे.
जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, निलेश आखाडे, शैलेश बेर्डे, मनोर दळी, सायली बेर्डे, राधा हेळेकर, चिन्मय शेट्ये, वर्षाताई ढेकणे, अशोक वाडेकर, अमित विलणकर, संतोष सावंत, संदीप सुर्वे, सतेज नलावडे, दादा ढेकणे आदींनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली होती. आज नगर परिषदेने पत्र दिले.
दरम्यान, शहरातील आठवडा बाजार येथील पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीलाही गळती लागली असून त्यामुळे नगरपरिषदेने याची माहिती घ्यावी व योग्य निर्णय घ्यावा, असे शहराध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले. त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने या टाकीची पाहणी करून स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश दिले आहेत, असे नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.