छत्तीसगड : राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यात एका अनोख्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे. डोंगरगड तालुक्यातील जारवाही येथील रहिवासी बीरेंद्र साहू यांनी डोंगरगाव भागातील करियाटोला गावातील 24 वर्षीय ज्योती साहूशी साखरपुडा केला. साखरपुड्याच्या विधीनंतर बीरेंद्र साहू यांनी हेल्मेट घालून लोकांना रस्ते सुरक्षेचा संदेश दिला.
बीरेंद्र साहू यांनी सांगितले की, त्यांचे वडील पंचराम साहू ग्रामपंचायत कालाकसा येथे सचिव होते. जानेवारी 2022 मध्ये कामावरून परतताना हेल्मेट न घातल्यामुळे अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचे निधन झाले. या घटनेनंतर साहू कुटुंबाने हेल्मेटबाबत जनजागृती सुरू केली.
साहू कुटुंबाने ‘हेल्मेट संगवारी’ नावाचा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत त्यांनी 1000 हून अधिक लोकांना हेल्मेट वाटप करून जनजागृती केली आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी आणि कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.
साखरपुड्याच्या वेळी बीरेंद्र साहू यांनी ज्योतीला अंगठी घातल्यानंतर हेल्मेट घालून सुरक्षा संदेश दिला. साखरपुड्यासाठी आलेल्या कुटुंबीयांना वाहन चालवताना हेल्मेट घालण्याचे महत्त्व पटवून दिले. या अनोख्या साखरपुड्यामुळे जिल्हाभर चर्चा रंगली आहे.