रामदास कदम यांचं धक्कादायक विधान
शिर्डी: मी तुम्हाला पुढचं भविष्य सांगतो. एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे रात्री दोन वाजता आपल्या फॅमिलीला घेऊन देश सोडून जातील. माझे शब्द तुमच्याकडे लिहून ठेवा. ज्यांनी बाळासाहेबांशी बेईमानी केली, शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी जे पाप केलं, त्या पापाचं प्रायश्चित उद्धव ठाकरेंना भोगावच लागेल, अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. रामदास कदम यांनी गुरुवारी सहकुटुंब साईदरबारी पोहोचत साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना कदम बोलत होते.
यावेळी रामदास कदम पुढे म्हणाले, मी साईंचा भक्त आणि सेवक आहे. साईबाबा मला नेहमी बोलावतात. दोन दिवसात सरकार बनेल. साईबाबांनी महायुतीला चांगलं यश दिलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचले. अडीच वर्षात महायुतीने ज्या पद्धतीने लोकाभिमुख निर्णय घेतले त्याच पद्धतीने भविष्यात चांगले निर्णय होऊ दे असे साकडे रामदास कदम यांनी साईबाबांना घातले. प्रधानमंत्री मोदी आणि अमित शहा यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास होईल, असा मला विश्वास असल्याचे कदम यांनी विश्वास व्यक्त केलाय. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्राने १८ ते २० तास जनतेचे काम करणारा मुख्यमंत्री पाहिला.
मागच्या वेळी आमचा आकडा कमी असताना आम्हाला भाजपच्या वरिष्ठांनी संधी दिली. आता भाजपचे १३३ हून अधिक स्वतःचे आमदार, त्यामुळे आम्ही किती मागावे? काय मागावे? याचे भान ठेवलं पाहिजे. आम्हा सर्वांचीच इच्छा की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. त्यांना देखील त्यांचा पक्ष चालवायचा आहे. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आमच्यात कुठलाही मतभेद नसतील असे कदम यांनी म्हटले आहे.
लोकसभेत त्यांना जास्त जागा मिळाल्या. जास्त खासदार निवडून आले तेव्हा त्यांनी मशीनवर खापर नाही फोडलं. आपल्या बाजूने निकाल लागला की मशीन चांगलं आणि विरोधात निकाल लागला की मशीन वाईट. आपलं अपयश झाकण्यासाठी ते मशीनला दोष देताय असे म्हणत रामदास कदम यांनी विरोधकांवर टीका केली.